मध्यरात्रीनंतर खेळ चाले इडली-डोश्याचा

माजिवडे नाक्यावर भर रस्त्यात खवय्यांची गर्दी
अपघातांना आमंत्रण देणारे बेकायदा व्यवसाय फॉर्मात
सुरेश सोंडकर/ठाणे
रिकाम्या रस्त्यावर सुसाट वाहने हाकताना अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. मग मध्यरात्री प्रचंड गर्दी रस्त्यावर इडली-डोसा खाण्यात मग्न असेल तर अपघातांना आमंत्रणच! माजिवडा नाक्यावर दिवसा बंद आणि मध्यरात्री चालू होणारे इडली-डोसा आणि चहाचे व्यवसाय धोक्याची घंटा वाजवू लागले आहेत.
पुण्यात सुसाट कारने दोन जीवांचा नाहक बळी घेतल्याची घटना सध्या चर्चेत आहे. त्या आधी आणि त्यानंतरही अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर माजिवडे नाका परिसर सध्या चर्चेत आहे. येथे दिवसा चिटपाखरुही दिसणार नाही, पण रात्री दोननंतर येथे रात्रीचे जीवन सुरू होते. या रस्त्यावरून लांब पल्ल्याचा प्रवास करणारी वाहने सतत ये-जा करीत असतात. यातील अनेक वाहनचालक भूक भागवण्यासाठी येथे थांबून इडली-सांबर, डोसा, चहाचा आस्वाद घेतात. सिगारेटींचा धूर या भागात व्यापून असतो. सध्या या ठिकाणी भर रस्त्यात खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.
या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, वाहने सुसाट धावत असतात. अशावेळी या गर्दीत नियंत्रण सुटून एखादे वाहन घुसले तर मोठी जीवितहानी होऊ शकते. अपघातानंतर आरोप प्रत्यारोप, मदत आणि हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आधी भर रस्त्यात गर्दीला आमंत्रण देणारे हे बेकायदा व्यवसाय बंद करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ठाण्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे तर हाकेच्या अंतरावर कापूरबावडी पोलीस स्थानक आहे. तरीही अपघातांना आमंत्रण देणारे हे मध्यरात्रीचे बेकायदा व्यवसाय दुर्लक्षित कसे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.