प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी स्विमिंग ठाणेकरांची पहिली पसंती.

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत व अशा दिवसांमधे पाण्यात खेळायला सर्वांनाच आवडते. क्रीडा प्रकारात विशेषतः एप्रिल – मे महिन्यांमध्ये स्विमिंगला जास्त मागणी असलेली पहायला मिळते. परंतु या सोबतच संपूर्ण वर्षभर या क्रीडाप्रकाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यातील अनेक मुले जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्विमिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिके पटकावत असताना पाहायला मिळतात. स्विमिंग हा क्रीडा प्रकार तर आहेच परंतु त्याच बरोबर व्यायामाच्या स्वरूपात ठाणेकर स्विमिंगला पसंती देताना दिसत आहेत.

स्विमिंगचे काही प्रमुख प्रकार –
फ्री स्टाईल/ फ्रंट क्रॉल, बॅकस्ट्रोक, फ्रंट स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, साईड स्ट्रोक इ.

ठाण्यातील काही स्विमिंग क्लबची माहिती

वसंत विहार स्पोर्ट्स क्लब –
ठाण्यातील हा प्रसिध्द क्लब असून गेली 25 वर्ष येथे स्विमिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. ५ वर्ष व त्यावरील मुलांना येथे बेसिक, ॲडव्हान्स व विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. दरवर्षी सुमारे ८०० ते १००० मुले येथे स्विमिंग शिकतात. येथील तरण तलाव वर शेड असल्याने पोहताना उन्हाचा त्रास होत नाही. त्यामुळे पूर्ण दिवस येथे विविध बॅचेसमध्ये स्विमिंग शिकवले जाते. गेल्या काही वर्षात वसंत विहार स्पोर्ट्स क्लब मधील अनेक मुलांनी स्विमिंगच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. लहान मुलांना पोहायला शिकवताना सुरुवातीच्या काही काळात विशेष लक्ष द्यावे लागते व हे एकाच कोच कडून शक्य होत नाही. त्यामुळे येथे प्रमुख कोच सोबत अन्य ७ ते ८ प्रशिक्षक स्विमिंगचे प्रशिक्षण देतात. सप्टेंबर 2023 ला बँगलोर येथे झालेल्या सी आय एस सी इ राष्ट्रीय स्विमिंग टूर्नामेंट (१९ वर्षाखालील वयोगट) मध्ये येथे सलग 6 वर्ष शिकत असलेल्या सिध्दी मुल्लार हिने १ सुवर्णपदक व तीन कांस्य पदके पटकावली आहेत. शंतनु कैचे, श्रेया पिलये, संचित पाटील, महीका माचिवाल, मायरा सिंग इ. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहे.

मारोतराव शिंदे तरण तलाव – मारोतराव शिंदे तरण तलाव हा ठाण्यातील ५० वर्ष जुना आहे. येथे वर्षभरात सुमारे 3000- 3050 मुले दरवर्षी स्विमिंगचे प्रशिक्षण घेतात. हा तलाव पूर्णतः ठाणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असून त्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून येथे प्रवेश घेता येतो. येथे प्राथमिक स्वरुपात स्विमिंगचे धडे दिले जातात. ८-९ प्रशिक्षक व सोबत महिला वर्गासाठी विशेष महिला प्रशिक्षक आहेत.

चंद्रशेखर निबरे (प्रशिक्षक) – मी २०१२ पासून स्विमिंगचे प्रशिक्षण देत आहे. स्विमिंग हा फक्त खेळ नसून उत्तम व्यायाम प्रकार आहे. बरीच मुलं त्याचप्रमाणे मोठी माणसं व्यायाम करणे या दृष्टिकोनातून स्विमिंग प्रशिक्षणासाठी येतात. वसंत विहार स्पोर्ट्स क्लबमध्ये मी सध्या स्विमिंगचे प्रशिक्षण देत असून क्लबचे चेअरमन डॉ. के.कुमार यांचा या दरम्यान खूप पाठिंबा मिळतो. प्राथमिक स्वरूपाचे स्विमिंग हे प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे.

सिद्धी गिरीश मुल्लूर – मी गेले 6 वर्ष स्विमिंग शिकत आहे. सर्वात प्रथम मला माझ्या वडिलांनी स्विमिंग शिकवले व त्यानंतर मी स्विमिंगचा क्लास लावला. अभ्यासासोबत माईंड रिफ्रेश करण्यासाठी मला स्विमिंगची मदत होते. गेल्यावर्षी बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्विमिंग टूर्नामेंटमध्ये मला सुवर्णपदक मिळाले व त्याचा मला खूप आनंद आहे. यासाठी मला शाळेचा व घरच्यांचा खूप पाठिंबा मिळाला. याही वर्षी मी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

किरण पाठक ( प्रशिक्षक) – मी ठाण्यात गेली अनेक वर्ष स्विमिंग शिकवत आहे. हल्ली ठिकठिकाणी स्विमिंगचे क्लासेस सुरू झाले आहेत. ठाणेकरांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे. विशिष्ट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्विमिंग क्लासेसला जास्त मागणी असते. परंतु स्वामिंग फक्त उन्हाळ्यापुरतेच मर्यादित न ठेवता वर्षभर केले तर ते मुलांच्या संपूर्ण शारीरिक वाढीसाठी पोषक ठरते. त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.


स्विमिंगचे फायदे :
-स्विमिंग हा फुल बॉडी वर्कआउट आहे. त्यामुळे मसल्स मजबूत होतात व ताकदही वाढते.
– रोज पोहल्याने नैराश्य कमी होते व त्यासोबतच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते.
– दररोज पोहणे कॅलरीज बनवण्यास मदत होते व त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. स्विमिंगमुळे चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात व त्यामुळे वजनही आटोक्यात येते.
– पोहण्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह लवकर होतो व त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते व हृदयही दीर्घकाळ निरोगी राहते.
– पोहण्यामुळे फुफ्फुस निरोगी राहते व अस्थमा असणाऱ्यांचा त्रास कमी होतो.
– झोप पटकन येत नसेल किंवा निद्रानाशचा त्रास असेल तर तुम्ही हमखास पोहायला हवे त्यामुळे तुमची झोप नक्कीच सुधारेल.