“पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेसला ४० जागाही नाहीत

अमित शाहांचा मोठा दावा

नवी दिल्ली: वेगवेगळे राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत वेगवेगळे दावे करत असताना आता भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या निवडून येणाऱ्या जागांबाबत मोठं भाकित केलं आहे.

पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने ३१० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेसला यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे भाजपा उमेदवार जगदंबिका पाल यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत अमित शाह म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचा सफाया झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत. तर अखिलेश यादव यांचे चार उमेदवारही जिंकून येणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो, असा दावा अमित शाह यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पीओके भारताचा भाग आहे आणि भाजपा तो परत मिळवेल. पाकिस्तानचे नेते म्हणतात की, पीओके त्यांचा आहे. काँग्रेसचे नेतेही सांगतात की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यांना मी सांगतो की, भाजपाचे लोक अणुबॉम्बला घाबरत नाहीत. पीओके भारताचा भाग होता, आहे आणि पुढेबी राहील, तसेच आम्ही तो परत मिळवू.

यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी परदेशात सुट्टीवर जाण्यासाठीची तिटिकं बुक केली आहेत. एकीकडे राहुल गांधी हे इटली, थायलंड आणि बँकॉकसाठी रवाना होतात, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी २३ वर्षांमध्ये कधीही सुट्टी घेतलेली नाही. एवढंच नाही तर ते आपली दिवालीसुद्धा सैनिकांसोबत साजरी करतात. भाजपाने निवृत्त सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना सुनिश्चित केली. तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही अमित शाह यांनी केला.