ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवार २३ मे रात्री १२ पासून शुक्रवार २४ मे रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीच्या काटई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे त्यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा २३ मे रात्री १२ ते शुक्रवार २४ मे रोजी रात्री १२ पर्यंत एकूण २४ तास बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ चा काही भाग वगळता ) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.
पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या काळासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.