नवी मुंबई: नेरूळ डीपीएस येथील सिडको जेट्टीच्या नामफलकाला धडकून आजवर १० ते १२ फ्लेमिंगोंचा जीव गेल्याची घटना ताजी असताना आता घाटकोपर खाडीत सोमवारी रात्री एमिरेट्सच्या विमानाला धडकून चाळीस फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरी भागात फ्लेमिंगोंचे योग्य संरक्षण होत नसल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे खाडीत विविध जैवविविधता आढळत असल्याने या खाडीत देशी-परदेशी पक्षांची नेहमीच रेलचेल असते. अशात हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील ठाणे खाडीत स्थलांतरीत फ्लेमिंगो पक्षांची गुलाबी चादर पहावयास मिळते. मात्र यंदाचे वर्ष हे फ्लेमिंगो पक्षांसाठी मृत्यूचे वर्ष ठरत चालले आहे. यापूर्वी नेरूळ जेट्टीवरील सिडकोच्या नामफलकाला धडकून १० ते १२ फ्लेमिंगोंचा जीव गेला असून तीन ते चार फ्लेमिंगो जखमी झाले होते. आता सोमवार २० मे रोजी रात्री पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये एमिरेट्स कंपनीच्या प्रवासी विमानाला धडकून ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.