म्युचल फंड – सहकारातून समृद्धीकडे

इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय हे मागील लेखात आपण समजून घेतले. मूलतः दीर्घकालीन गुंतवणूक असते. कोणत्याही कंपनीच्या व्यवसायात उतार चढाव असतात. पर्यायाने इक्विटी गुंतवणुकीमधील परताव्यामध्येही उतार चढाव असतात. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदार या उतार चढावांवर यशस्वीपणे मात करून आकर्षक परतावा मिळवू शकतो. अनेक यशस्वी गुंतवणूकदार उदाहरणार्थ राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, वॉरन बफेट हे सामान्य गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला देतात आणि अल्पावधीत नफा कमवून देणाऱ्या स्कीम्स पासून दूर राहायला सांगतात.

इक्विटी म्युच्युअल फंड हे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला इक्विटी शेअर्समध्ये योग्य प्रकारे, सातत्याने आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी अतिशय योग्य पर्याय आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड मध्येही बाजारात अनेक प्रकारच्या स्कीम्स उपलब्ध आहेत. या स्कीम्समध्ये कोणती स्कीम आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला या स्कीम्सबद्दल मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सेबीने स्कीम्सच्या वर्गीकरणाचे नियम घालून दिलेले आहेत. हे वर्गीकरण कंपनीच्या बाजार मूल्यावर (Market Capitalisation) आधारित आहे. त्यासाठी सर्वप्रथम बाजार मूल्य म्हणजे काय हे समजून घेऊ.

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कोणत्याही कंपनीच्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या शेअर्सचा एकत्रित बाजार भाव. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर

मार्केट कॅपिटलायझेशन = कंपनीच्या शेअर बाजारातील एकूण शेअर्सची संख्या ( नंबर ऑफ शेअर्स) * प्रतिशेअर बाजार भाव ( मार्केट प्राइस पर शेअर)

कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची किंमत शेअर बाजारात त्याच्या शेअर्सच्या पुरवठा आणि मागणी द्वारे निर्धारित केली जाते. कंपनीशी संबंधित अनुकूल घटकांमुळे जर शेअर्सची मागणी जास्त असेल तर किंमत वाढते. उदाहरणार्थ कंपनीचे रिझल्ट चांगले असतील, व्यवसाय वाढीच्या अपेक्षा असतील तर शेअर्सची किंमत वाढते.

सेबीच्या नियमानुसार मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर कंपन्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप.

लार्ज कॅप कंपन्या
टॉप १०० कंपन्या

मिडकॅप कंपन्या
101 पासून 250 स्थानापर्यंत असणाऱ्या कंपन्या

स्मॉल कॅप कंपन्या
२५१ पासून पुढे

याच वर्गीकरणाच्या आधारावर म्युच्युअल फंड स्कीम्सचेही वर्गीकरण केलेले आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये विविध स्कीम्स आणि त्यांच्या पोर्टफोलिओ संरचना याची माहिती आहे.

लार्ज कॅप स्कीम्स
कमीत कमी 80% गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केली जाते

मिडकॅप् स्कीम्स
कमीत कमी 65% गुंतवणूक मिडकॅप कंपन्यांमध्ये केली जाते

स्मॉलकॅप स्कीम्स
कमीत कमी 65% टक्के गुंतवणूक स्मॉलकॅप स्कंपन्यांमध्ये केली जाते

मल्टीकॅप स्कीम्स
25% लार्ज कॅप, 25% मिडकॅप, 25% स्मॉल कॅप

फ्लेक्सीकॅप स्कीम्स
कमीत कमी 65% गुंतवणूक इक्विटीमध्ये करणे गरजेचे आहे. कंपन्यांची निवड मॅनेजर करतो.

लार्ज अँड मिडकॅप स्कीम्स
35% लार्ज कॅप, 35% मिडकॅप कंपन्यांमध्ये केली जाते

याव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारच्या स्कीम्स उपलब्ध आहेत जसे

सेक्टरल स्कीम्स ज्या विशिष्ट सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ बँकिंग अँड फायनान्स, एनर्जी, एग्रीकल्चर, आयटी

फोकस स्कीम्स ज्या काही विशिष्ट मोजक्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात

परदेशी कंपन्यांमध्ये / बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या स्कीम्स

इक्विटी लिंक सेविंग स्कीम्स (ELSS) या स्कीम्स मधील गुंतवणूक इन्कम टॅक्ससाठी सेक्शन 80 C खाली दाखवता येते. या स्कीम्समध्ये तीन वर्षाचे लॉकइन असते.

वर दिलेल्या स्कीम्सपैकी कोणती स्कीम आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी खालील बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

गुंतवणूकदाराचे वय

गुंतवणुकीचा कालावधी.

जोखीम घेण्याची क्षमता : जोखीम जास्त तर रिटर्न जास्त ह्यानुसार मिडकॅप आणि स्मॉल कॅप मधील रिटर्न्स हे लार्जकॅप मधील रिटर्न्सपेक्षा जास्त असतात.

प्रत्येक गुंतवणूकदाराची गुंतवणूक करण्याची क्षमता, त्यासाठी असलेला कालावधी, परताव्याची अपेक्षा, त्याची आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींवर स्कीम्सची निवड अवलंबून असते. म्हणूनच गुंतवणूकदारांनी इतरांचे अंधानुकरण करून गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. आपली ध्येय, आपले उद्दिष्ट, आपला कालावधी यांना अनुरूप अशी स्कीम डोळसपणे निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यावसायिक सल्लागाराचा अथवा डिस्ट्रीब्यूटरचा सल्ला घेणे उचित ठरते.

अंजली जोशी
mutualmudra@gmail.com
whatsup: 9892293215