‘त्यांच्या’ सतरंज्या उचलण्यापेक्षा शिवसेनेत या

उद्धव ठाकरे यांची निष्ठावंत भाजप कार्यकत्यांना साद

ठाणे : आमच्या शिवसेनेसमोर एखादा निष्ठावंत भाजप कार्यकर्ता असता तर निवडणुकीत रंगत आली असती. पण रामभाऊ म्हाळगींचे विचार जोपासणारा सच्चा संघविचारी कार्यकर्ता आज गद्दार उमेदवारांच्या सतरंज्या उचलत आहे. त्या निष्ठावंत भाजप कार्यकत्यांना आपण ऑफर देतो, या आमच्या शिवसेनेत. आपण एकत्र मिळून हिंदूत्वाचे विचार पुढे घेऊन जाऊ, अशी साद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात घातली.

महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांची डोंबिवलीतील प्रचार सभा आटपल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. महा विकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेच्या व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, आमदार जितेंद आव्हाड आदी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नकली शिवसेना, वीर सावरकर यांचे विचार, गद्दारी या नेहमीच्या भाषणाची पुनरावृती त्यांनी येथे केली. पण त्यांचा प्रमुख रोख होता तो गदारी विरुद्ध निष्ठावंत या मुद्दयाकडे. ठाण्याने शिवसेनेला सत्तेचे माप पदरात टाकले. या ठाण्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम होते. त्या ठाण्याचे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्याची निष्ठा गदारांनी विकली,. आता तिथे चोरांची टोळी बसते असा घाणाघात ठाकरे यांनी केला.

नकली संतान, नकली शिवसेना म्हणतात. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेचा मला वारसदार घोषीत केले होते. यांना घराणेशाही नको मग कल्याणमध्ये उमेदवारी कशी दिली. ज्या प्रमोद महाजन यांनी राज्यात भाजप वाढवली त्यांच्या मुलीला तिकीट नाकारले. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे मान्य आहे का असा सवाल त्यांनी केला.

४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यांचे वय ७५ झाले की भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही असेही ते म्हणाले. चौदा वेळानंडावळ्या बांधल्या तरी २०२९ मध्ये पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधायला ते तयार आहेत. वास्तविक त्यांनीच आता हा देश पुढच्या पिढीच्या हातात सोपवायला हवा, असे ते म्हणाले.