आज प्रचाराच्या तलवारी म्यान

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभेच्या जागांसह पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या संध्याकाळी बंद होणार आहेत.

कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघात सुमारे ६६ लाख मतदार आहेत. या तीन मतदार संघांसह राज्यातील शेवटच्या टप्प्यातील १३ मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होणार आहे. या तीन मतदारसंघात सुमारे ८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, परंतु प्रमुख लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणार आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात प्रमुख लढत महायुतीचे नरेश म्हस्के विरुद्ध महाविकास आघाडीचे राजन विचारे यांच्यात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रचार रॅली काढली तसेच त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरारोड येथे तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कळवा येथे जाहीर सभा घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले तर राजन विचारे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांच्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी प्रचार सभा घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे, आणि वैशाली दरेकर तर महायुतीचे कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे या उमेदवारानी देखिल संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता चौक सभा घेतली होती. महायुतीच्या उमेदवरांच्या प्रचाराकरिता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रचार सभा घेऊन युतीला मतदान करण्याचे आवाहन केले तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे यांनी प्रचार सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार असल्याने उद्या युती आणि आघाडीचे उमेदवार रॅली काढून प्रचाराचा सांगता करणार आहे.