राजस्थान वूमेन्स अंडर 23 संघाने ठाण्याला शैलीत अलविदा केले

‘अ’ गटातील अव्वल स्थानी असलेल्या राजस्थानने सोमवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दुसऱ्या क्रमांकाच्या सौराष्ट्रचा सहा विकेट्स राखून पराभव करत वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सलग सहावा विजय नोंदवला.

सौराष्ट्रची सलामी जोडी उमेश्वरी जेठवा आणि शिफा करीमभाई यांनी 13.1 षटकांत 41 धावा जमावून दमदार सुरुवात केली. परंतु राजस्थानच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सौराष्ट्राला 50 षटकांत आठ गडी बाद 95 एवढ्या कमी धावसंख्येपर्यंत रोखले. जेठवा (24) आणि करीमभाई (16) बाद झाल्यानंतर सौराष्ट्रला धावफलकात फारशा धावा जोडता आल्या नाहीत. हिरवा वढेर (19) आणि सुजन समा (नाबाद 17) हे इतर फलंदाज होते ज्यांनी सौराष्ट्रासाठी दुहेरी अंकात धावा केल्या. डावखुरी फिरकी गोलंदाज शानू सेन, जिने नवीन चेंडूने गोलंदाजी केली, ती राजस्थानसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 10 षटकांत, ज्यात सात मेडन्सचा समावेश होता, फक्त तीन धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

शानू सेन

राजस्थानच्या सिनियर वूमेन्स संघासाठी आधीच खेळलेली आणि WPL 2023 दरम्यान मुंबई इंडियन्सच्या नेट गोलंदाजांपैकी एक असलेली सेन हिने ठाणेवैभवला सांगितले, “मला नवीन चेंडूने गोलंदाजी करायला आवडते. मी चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकते आणि टप्पा पडल्यावर मी टाकलेला चेंडू अधिक वेगाने फलंदाजपर्यंत देखील पोहोचतो. त्यामुळे नवीन चेंडूने गोलंदाजी करणे माझ्या फायद्याचे ठरते. मी नेटमध्ये नवीन चेंडूने गोलंदाजीचा खूप सराव करते. सामन्यांदरम्यान, माझ्याकडून नवीन चेंडूने चार षटके अपेक्षित असतात. माझे लक्ष नेहमीच डॉट बॉल्स टाकण्यावर असते ज्याणेकरून फलंदाज दडपणाखाली येतो आणि विकेट देतो.”

या सामन्यापूर्वी राजस्थानने पाच पैकी चार सामने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले होते. या सामन्यात त्यांनी 32.2 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य पार केले. त्यांनी 11 षटकांत 33 धावांत त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज गमावले असले तरी, दिक्षा सैनी आणि डिंपल कंवर यांनी शानदार फलंदाजी करून आपल्या संघाला सावरले. सैनी (24) आणि कंवर यांनी चौथ्या विकेटसाठी 62 धावांची सामना जिंकणारी भागीदारी रचली. कंवर (38*) ने तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.

डिंपल कंवर आणि दिक्षा सैनी

 

सामन्यानंतर, सैनी, जिने भूतकाळात राजस्थान वूमेन्स अंडर 19 चे प्रतिनिधित्व केले आहे, म्हणाली, “आमची योजना सिंगल्स आणि डबल्स काढायची होती. आम्ही संयमाने खेळायचे ठरवले होते आणि फक्त ज्या चेंडूंवर हल्ला करता येईल त्याच चेंडूंवर आम्ही चौकार मारले. आम्हाला भागीदारी करून सामना जिंकायचा होता.”

कंवर, जिने राष्ट्रीय स्तरावर पाच खेळ (कराटे, स्केटिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन आणि कबड्डी) खेळले आहेत, अधिक माहिती देताना सांगते, “आम्ही शांत मनाने खेळलो. किती चेंडूत किती धावा पाहिजेत याच्यावर आमचे सतत लक्ष होते. त्यांचे (सौराष्ट्रचे) फिरकीपटू खूपच मंद गतीने गोलंदाजी करत होते. त्यामुळे आम्हाला आमची मोठे फटके मारण्याची इच्छा नियंत्रणात ठेवणे महत्वाचे होते कारण जर आमचा फटका चुकला असता तर आमची विकेट गेली असती आणि संघ अडचणीत आला असता.”

दादोजी कोंडदेव स्टेडियम बुधवारी शेवटचा वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामना आयोजित करेल. गोवा आणि जम्मू-काश्मीर यांच्यात हा सामना होणार आहे.