बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करताना प्रवाशांच्या हिताला प्राधान्य; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सूतोवाच

बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. विकास कामे करताना प्रवाशांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिले जाईल, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात केले.

बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी पाहून नवीन पादचारी पूल बांधणी करणे, लिफ्ट, सरकते जिने, उपहारगृह आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत, मात्र या सुविधा पुरवण्यासाठी बदलापूरचा प्लॅटफॉर्म एक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. यावरून प्रवासी वर्गात नाराजीची भावना पसरली होती. तीन प्लॅटफॉर्म असलेल्या स्थानकात एक प्लॅटफॉर्म बंद केल्यास प्रवाशांची गैरसोय होणार असल्याची तक्रार होती. यासंदर्भात मंत्री पाटील यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी, प्रवासी संघटना तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

भविष्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोयी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी काही दिवस थोडासा त्रास प्रवाशांना होण्याची परिस्थिती आहे. तरीही प्लॅटफॉर्म एकवर टप्याटप्याने कामे करून, पूर्ण प्लॅटफॉर्म बंद करू नये, प्रवाशांना कमीत कमी त्रास होऊन सोयी, सुविधा देण्याचे काम करावे असे संबंधितांना सांगण्यात आल्याचे खा. पाटील म्हणाले.

येत्या महिनाभरात बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहराध्यक्ष संजय भोईर, बाळा घोरपडे, श्रीकांत चिमोटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.