घाऊक बाजारात मेथीच्या दरात घसरण

नवी मुंबई : मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्या पिकांवर मोठा परिणाम झाला होता. त्यावेळी घाऊक बाजारात २५ रुपये दराने मेथीची जुडी विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच जुडी अवघ्या पाच रुपयांना विकली जात आहे.

मागील महिन्यात बाजारात मेथीची आवक घटून दरात वाढ झाली होती. घाऊक बाजारात मेथीची एक जुडी २५ रुपयांवर तर किरकोळ बाजारात ४५ ते ५० रुपयाने जुडी विकली जात होती. मात्र आता पालेभाज्या पिकाला पोषक वातारण तयार झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरात प्रचंड घसरण झाली आहे. घाऊक बाजारात सध्या पाच ते सात रुपये प्रती किलो जुडी विकली जात आहे.

हिवाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणून मेथीची ओळख आहे. हिवाळ्यातील वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतुंच्या तुलनेत वाढते. मात्र मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका मेथी पिकाला बसला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक मेथीचे पीक पुणे आणि नाशिकमध्ये घेतले जाते. अवकाळीनंतर राज्यात थंडी कायम राहिली आहे. त्यामुळे पालेभाज्या पिकाला आता पोषक वातावरण तयार झाल्याने उत्पादन वाढले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात सध्या मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शुक्रवारी नाशिकमधून एपीएमसी बाजारात २७ गाड्यांमधून ७०,५०० क्विंटल मेथी आवक झाली होती. आवक वाढल्याने दरात देखील घसरण झाली असून घाऊक बाजारात प्रती जुडी पाच ते सात रुपये दराने विकली जात आह, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.