ठाणे जिल्ह्याला हुडहुडी; बदलापूर सर्वाधिक गारठले

ठाणे: दडी मारलेल्या थंडीने गेल्या पाच दिवसांपासून ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणाला चांगलेच गारठवले आहे. आज ठाणे जिल्ह्यात सरासरी १२ ते १३ अंश सेल्सिअस तापमान आढळून आले. बदलापूरमध्ये सर्वाधिक कमी १०.८ अंश सेल्सिअस तापमान होते. तर पालघर जिल्ह्यात तलासरीमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात ९.२अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सावर्डे येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमान आढळले. कर्जत आणि आवलेगांव येथे ११.२°, कल्याणमध्ये १२.३°
विरारमध्ये १२.८°, ठाणे आणि नवी मुंबईत १४.८°, पनवेल आणि दापोलीमध्ये १३.२°, चिपळूणमध्ये १३.८° तर मुंबईमध्ये आज १५.२ अंश सेल्सिअस तापमान आढळून आले.

बदलापूरकरांनी आज बोचऱ्या थंडीचा अनुभव घेतला. शहरातील आजचे तापमान १०.८° होते. रोज सकाळी फेरफटका मारायला जाणाऱ्या अनेकांनी ब्लँकेट अंगावर ओढून झोपणे पसंत केले. चार दिवसांपूर्वी बदलापूर शहरातील सकाळचे तापमान ११ अंश सेल्सिअस होते. त्या नंतर आज पुन्हा तापमान १०.८ अंश सेल्सिअस एवढे खाली आले. रात्री पासूनच हवेत गारठा जाणवत असल्याने, दुकाने, बाजारपेठा १० नंतर शांत झाल्या होत्या. या मोसमातील आजचे तापमान हे सर्वाधिक कमी होते.

ठाणे शहरही थंडीने गारठू लागले आहे. नेहमी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी आज दांडी मारली, त्यामुळे तलाव परिसर आणि रस्ते भल्या पहाटे मोकळे दिसत होते. मात्र नोकरीसाठी जाणारे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची लगबग नेहमीप्रमाणे दिसत होती. थंडी वाढल्याने पंखे, एसी, कुलर यांना सध्या आराम मिळाला आहे तर सकाळी चहाच्या टपऱ्या, आणि संध्याकाळी चायनीज सूप आणि वडापावच्या गाड्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.