घोडबंदरमध्ये कोरडा सप्ताह; रोज लागतात पाण्याचे १५ टँकर

ठाणे: एरव्ही वर्षभर पाणी टंचाईची झळ बसणाऱ्या घोडबंदर परिसरात स्टेमच्या दुरुस्तीमुळे सध्या कोरडा सप्ताह सुरू आहे. त्यामुळे येथील गृहसंकुलांसाठी रोज पाण्याचे किमान १५ टँकर पुरवावे लागत आहेत. एकूणच या परिसरात पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी स्टेमने घेतलेल्या शुक्रवारच्या शटडाऊननंतरही घोडबंदर परिसराला गेल्या सहा दिवसांपासून पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या या परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी अक्षरशा टाहो फोडावा लागत असून टॅकंरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून टॅँकरची मागणी दुप्पटीने वाढल्यामुळे टँकरचा फेरा वाढला आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शुक्रवारी २४ तासांचा शटडाऊन घेतला होता. त्यामुळे या परिसरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद झाल्याने येथील रहिवाशांना टँकरचा आधार घ्यावा लागला. शनिवार, रविवार आणि सोमवारी सुट्ट्या होत्या. त्यानंतर वॉल्व्हमेनपासून इंजिनिअर, अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना मराठा आरक्षणाच्या सर्व्हेच्या कामाला जुंपण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

घोडबंदर परिसरात एकीकडे बहुमजली टॉवर उभारण्यात येत असून त्यातील रहिवाशांना पाणी कुठून देणार असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला आहे. या परिसराला अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी अधिवेशनात वारंवार आवाज उठवला असून अनेक आंदोलने आणि चळवळीही केल्या आहेत. जोपर्यंत पुरेसे पाणी वाढवून मिळत नाही तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानग्या देण्यात येवू नये, अशी भूमिका मांडली आहे. याबाबत आयुक्तांना भेटून चर्चाही केली आहे. या परिसराला अतिरिक्त पाच नव्हे तर दहा एमएलडी पाण्याची गरज असल्याचे मतही श्री.केळकर यांनी व्यक्त केले आहे.

घोडबंदर परिसरातून पाण्यासाठी रोज सरासरी चार ते पाच टँकरची मागणी होत आहे. पण गेल्या चार दिवसांपासून टँकरची मागणी वाढली आहे. दोन दिवसांपासून या परिसरात दररोज सुमारे १५ टँकर पाठवण्यात येत असल्याची माहिती पालिकेकडून मिळाली आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी समिती गठन करण्यात आली आहे. या समितीच्या आज झालेल्या बैठकीत नागरिकांच्या एकूण १७ शिष्टमंडळांनी आपल्या तक्रारी आणि निवेदने सादर केली. त्यात मुंब्रा आणि ठाणे शहर येथील प्रत्येकी एक तर, घोडबंदर रोड परिसरातील १५ शिष्टमंडळांचा समावेश होता. वाघबीळ, विजयनगरी, हावरे सिटी, लोढा-भाईंदरपाडा, ओवळा नाका या घोडबंदर परिसरातील सर्वाधिक तक्रारी-निवेदनांचा समावेश आहे. हावरे इस्टेट, हावरे सिटी, ग्रीन स्क्वेअर,उन्नती गार्डन, प्राईड रेसिडन्सी, ओम साई सोसायटी, हिरकणी सोसायटी, दोस्ती रुबी, कांचनपुष्प, जहांगीर, मानस आनंद, ओसवाल पार्क-सह्याद्री सोसायटी, कॉसमॉस पार्क, लल्लानी आदी भागातील नागरिकांनी घरगुती पाणी पुरवठ्याबद्दलच्या तक्रारी-निवेदने समितीसमोर सादर केली.