आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी घेतला विद्यार्थ्यांसोबत खिचडीचा आस्वाद

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांसह या विद्यार्थ्यांसोबत खिचडीचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्या बौद्धिक कौशल्याचीही चाचपणी केली.

या उपक्रमात महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये शाळानिहाय सकाळ व दुपारच्या सत्रात महापालिका आयुक्तांसह, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. त्यानुसार आज सकाळी ९.३० वाजता आणि दुपारी १.३० वाजता अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत सस्नेह भोजन केले. मुलांची बैध्दिक कौशल्याची देखिल चाचपणी केली.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व खेळात प्राविण्य प्राप्त व्हावे याकरिता नुकत्याच क्रिडा शिक्षकांच्या नेमणूका केल्या आहेत. तसेच सेमी इंग्रजी आणि इयता ९ व १० वी चे वर्ग सुरु करण्यात आले असून त्यासाठी विशेष शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. मुलांना आधुनिक शिक्षणाची जोड द्यावी याकरिता, डिजिटल वर्ग सुरु केले आहेत. शासन व महापालिकाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्नेहभोजनातून महापालिका अधिकाऱ्यांच्या मनात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यां प्रति आपलेपणा निर्माण करणे हा आयुक्तांचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी स्वतः आयुक्तांनी मुलांच्या पंगतीला बसून स्नेहभोजन केले.

त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी देखिल मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवा म्हणून जी मुले अभ्यासात मागे पडलेली आहेत त्यांच्यासाठी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विशेष वर्ग सुरु करणे तसेच मनपा शाळेत शिक्षण घेणारी मुले ही दुर्बल घटकातील असल्याने त्यांना अभ्यासाठी चांगले वातावरण घरी उपलब्ध होत नाही त्या मुलांसाठी शाळेतच अभ्यासिका सुरु करण्याचा मानस असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनपा शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन नाटयगृहात आयोजित करण्याचे शिक्षणाधिकारी यांना निर्देश दिले. पोषण आहार व विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबाबत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले. ज्या काही त्रुटी आहेत त्यावर काम करुन त्या लवकरात लवकर दुर करुन महापालिका शालेय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या स्नेहभोजनाचा उपक्रम यापुढे ही राबविला जाईल असे आयुक्त संजय काटकर यांनी या प्रसंगी सांगितले.