‘कोंबडी’ फस्त करणार काय?

ज्या मुंबई महापालिकेकडे देशातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आदर्श म्हणून पहात आल्या आहेत, तिचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात अडकावा हे काही बरे नाही. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींची रक्कम तब्बल आठ हजार कोटींनी कमी झाली आहे. याचा अर्थ या रकमेच्या ठेवी मोडीत काढून तो नागरी प्रकल्पांवर खर्च करण्यात येणार असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. दैनंदिन खर्च, उदा. पगार, बोनस वा अन्य शिर्षकांखाली एवढी मोठी रक्कम खर्च होत नाही ही समाधानाची बाब असली तर या प्रकल्पांच्या खर्चाची तरतुद वार्षिक उत्पन्नातून महापालिका करु शकत नसेल तर ती गंभीर बाब ठरते. ठेवी मोडण्याचा अर्थ, आर्थिक स्थिती चांगली नाही असाही होत असतो आणि महापालिका त्याबद्दल तोंडातून ब्र काढत नाही, यावरुन या महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी का म्हणतात याचा खुलासा होतो.

मुंबई महापालिकेकडे आदर्श म्हणून पाहिले जाण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक-तिची आर्थिक शिस्त. 84 हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी जमा होणे हे या शिस्तीचे द्योतक. आता ही रक्कम कमी होणे म्हणजे शिस्तीची चौकट खिळखिळी होणे असा परंपरागत अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे ठेवींवर डोळा ठेवणार्‍ यांच्या हेतु आणि कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते.
अर्थात ठेवी असणे वा संचित म्हणून सोन्यानाण्यात गुंतवणूक करणे हा विचार कालबाह्य समजला जाऊ लागला असताना ही रक्कम व्यवहारात आणून त्यामुळे होणारे दृष्य वा अदृष्य फायदे, ज्यांचे की पैशांत मूल्यमापन होऊ शकणार नाही, नागरीकांसाठी मिळवण्यात काय गैर आहे असा युक्तीवाद केला जाऊ शकतो. त्यात तथ्य आहे. पण म्हणून केवळ जनहीतासाठी असा खर्च घरगुती पातळीवर जेव्हा केला जातो तेव्हा त्यास ‘ॠण काढून सण साजरा करणे.’ असे बोलले जाते. मुंबई महापालिकेचे प्रशासन असे कोणाच्या आदेशावरुन वागत आहे की हे पूर्णपणे प्रशासकीय डोके आहे. दुसरी शक्यता-रक्कम पहाता कमी वाटते. त्यामुळे राज्यकर्त्यांकडे संशयाची सुई वळते.

आर्थिक मंदी, कोव्हिडमुळे झालेली पिछेहाट, एकाच वेळी अनेक नागरी प्रकल्पांची कामे हाती घेणे आदी बाबींमुळे आर्थिक ताण पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुदत ठेवीत हात घातला गेला. ही अपवादात्मक बाब असली तरी पायंडा पडण्यास पुरेशी आहे. खर्च झालेले पैसे पुन्हा ठेवीत रुपांतरित होणार का? जी सुविधा निर्माण होईल तिच्या उपभोगातून पैसा उभा राहिल का? भले उत्पन्न मिळाले नाही तरी तेवढी बचत होईल का? या सर्व व्यावहारिक बाबींचा विचार ‘कोंबडी’वर सुरी फिरवणार्‍यांनी केला असेल काय?