कोटीच्या कोटी उड्डाणे!

अयोध्येतील राममंदीरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे आणि देशात एक वेगळ्याच चैतन्याची लाट उसळली आहे. या लाटेचे रुपांतर भाजपा सत्तेत तिसर्‍यांदा येण्यासाठी करणार यात वाद नाही. किंबहुना त्यांनी तसा प्रयत्न केला नाही तरी जनमतावर या ऐतिहासिक घटनेचा प्रचंड प्रभाव असणार यात वाद नाही. या घटनेनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या रहाणार्‍या उमेदवारांना दुहेरी फायदा होणार आहे. एक-मोदींच्या चेहऱ्याचा लाभ तर मिळणारच आणि ज्यांना मोदींबद्दल तरीही काही आक्षेप असतील, त्यांना ‘रामलल्ला’ची मूर्ती आकर्षित करीत रहाणार! राजकीय फायद्या-तोट्याभोवती अयोध्येतील राममंदीराचा विचार करणे पुरेसे होणार नाही, हे जाणून असणाऱ्या भाजपा नेतृत्वाने राममंदीराच्या पार्श्वभूमीवर अन्य लोकहिताच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा विचार सुरु केलेला दिसतो. त्याचे ताजे उदाहरण प्रधानमंत्री ‘सूर्योदय योजना’ हे आहे.

प्रभूू रामचंद्र हे सूर्यवंशी कुळातील असल्यामुळे देशातील किमान एक कोटी घरांच्या छपरांवर ‘सौर ऊर्जेचे’ उपकरण लावण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. विकासाला भावनेचा आधार देऊन एखादी योजना यशस्वी करण्याची ही क्लृप्ती श्री. मोदी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीची झलक आहे. रामावर असलेली श्रद्धा सिद्ध करण्यासाठी सूर्यवंशी या नात्याने सौर ऊर्जेचा वापर करण्याचे बंधन श्री. मोदी यांनी घातले आहे. भावनिक पातळीवर केलेले असे आवाहन प्रगतीला पुरक ठरणार असेल तर विरोधी पक्षही त्यावर आक्षेप घेऊ शकणार नाहीत. त्यात भले विपक्षांना राजकारण दिसत असले तरी सौर ऊर्जेेसारख्या विषयांत ते आणून जनतेमधील आधीच दुबळी झालेली प्रतिमा खराब करुन घेण्याची जोखिम ते उचलणार नाहीत.

अयोध्यातील पर्यटनाला ‘अच्छे दिन येणार’ हे सांगायला तज्ज्ञाची गरज नाही. विमान कंपन्या असोत की हॉटेल्स यांचे आरक्षण मिळणे कठीण होत चालले आहे. मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित कालांतराने सुधारले तरी पर्यटकांच्या वाढत्या संख्येला सेवा पुरविणारे लहान-मोठे धंदे, त्यातून तयार होणारे रोजगार, फळ-भाज्या, अन्नधान्य यांची वाढती मागणी अशा असंख्य व्यावसायिक संधीमुळे अयोध्येतील रहिवाशांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. मंदीर बांधताना कदाचित या लाभाचा विचारही झाला नसेल, परंतु प्रत्यक्षात तो होत आहे, हे नाकारुन चालणार नाही. रामाची-भक्ती संसाराचा गाडा चालवण्यासाठी अध्यात्मिक किंवा मानसिक पातळीवर उपयोग होऊ शकेल. पण उदरनिर्वाहासाठी हातांना काम लागणारच. हा व्यावहारिक दृष्टीकोन भाजपाच्या नेतृत्वाने बेमालुमपणे आणला. ही अपरिहार्यता उगाच धर्मात बांधून ठेवण्याचा अट्टाहास त्यांनी केलेला नाही. उलटपक्षी जगभरातून पर्यटक यावेत यासाठी विमानतळासारख्या भव्य प्रकल्पात पैसाही ओतला आहे. मारुतिच्या स्तोत्रातील ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ अयोध्येतील राममंदीरामुळे आपल्याला पहायला मिळणार आहे.

हिंदुत्वाचे कार्ड निवडणुकीत चालेल यासाठी हा सारा खटाटोप आहे, असे म्हटले जात असेल तर त्याचवेळी होणारी उलाढाल आणि त्याचे फायदे यांचाही विचार होणे अगत्याचे ठरेल.