कौपिनेश्र्वर मंदिरात फुलला भक्तीचा मळा

* मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पूजा
* ढोल वाजवून भक्तांचा वाढवला उत्साह

ठाणे : अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा कोणी पाहत असेल किंवा नसेल, पण हा सोहळा स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे हे दोघे नक्की पाहत असतील, असे टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शहस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह “जय श्रीराम” चा जयघोष केला. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर ठाण्याची ग्रामदेवता असलेल्या कौपीनेश्वर मंदिरामधील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी महाआरती केली. दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक सोहळा कोणी पाहत असेल किंवा नसेल. पण, हा सोहळा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघे नक्की पाहत असतील असे सांगत नाव न घेता, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र आणि अयोध्येचे एक आगळेवेगळे जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच सर्वांचे स्वप्न साकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कोपीनेश्वर या प्राचीन मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आले होते. गुढी पाडव्याच्या दिवशी कोपीनेश्वर मंदीर येथून मिरवणुक काढण्यात येते. त्या दिवशी मंदिरात जसे वातावरण असते, तसेच काहीसे वातावरण सोमवारी महाआरतीच्या निमित्ताने दिसून आले. मंदिरात सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आलेली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा महासोहळा रामभक्तांना पहाता यावा, यासाठी मोठा पडदा लावण्यात आला होता. त्यावर अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात येत होते.

सोमवार सकाळपासूनच कौपीनेश्वर मंदिरात रामभक्त पारंपारिक वेशभुषेत जमण्यास सुरूवात झाली. खांद्यावर श्रीरामाचे मफलर घेऊन भक्तांकडून रामाचा जयघोष सुरू होता. ढोल-ताशे आणि बँजोच्या तालावर अनेक भक्त थिरकत होते. महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामभक्तांसोबत अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पाहिले. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या आणि त्यास भक्तांनी प्रतिसाद दिल्याने परिसरातील वातावरण राममय झाले होते. परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त अभिजीत बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १११ फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली. प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीने २३ दिवस सुगंध दरवळत ठेवणारी १११ फुटांची अगरबत्ती तयार केली आहे. चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्यांनी अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती १८ कारागिरांनी २३ दिवसात तयार केली. ही अगरबत्ती २३ दिवस ५०० मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. ही अगरबत्ती मैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली असून मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर महाआरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.