थंडीत प्रदूषण वाढले, श्वसनाचे आजार बळावले!

ठाणे: गुलाबी थंडी प्रत्येकाला हवी हवीशी वाटत असली तरी या थंडीत प्रदूषणामध्ये वाढ होऊन श्वसन आणि फुप्फुसाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

थंडीच्या काळात हवेमध्ये गारवा असतो तसेच हवा जास्त उंचावर जात नाही, त्यामुळे धूळीचे कण हे उंच जात नाहीत. त्याचा थेट परिणाम श्वसनावर होतो, त्यामुळे ऍलर्जीचे देखिल आजार बळावतात. सर्दी-पडसे या आजाराबरोबरच फुफ्फुसाचे विकारही जडतात. त्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉककरिता जाणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. ज्या ठिकाणी खुली व्यायाम शाळा आहे तेथे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सर्दीचे आजार जडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. थंडीच्या दिवसात म्हणजे २२जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार आहे या दिवशी देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे त्या दिवशी दीपोत्सव करावा परंतु फटाक्यांची आतषबाजी करू नये. फटाक्यांच्या धुराने आणखी प्रदूषण वाढण्याची भीती पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दिवसात शेकोटी पेटवून धूर करणे देखिल धोक्याचे असल्याचे अनेकांनी सांगितले.

श्वसन रोग तज्ञांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या काळात फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होते तसेंच दम्याचा आजार असलेल्या रुग्णांना जास्त त्रास होतो, त्यामुळे खबरदारी घ्यावी. शक्यतो पहाटे घराच्या बाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.