कोव्हिडपेक्षा गंभीर

हवामान बदल हा सध्या सर्वाधिक चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. तशा हवापाण्याच्या गप्पा पूर्वीही चालायच्याच. परंतु त्याचा उपयोग पुढे संवाद सुरु रहावा याच्या नांदीपुरताच मर्यादित असे. हवापाण्याच्या, प्रसंगी क्रिकेट वा ढासळणाऱ्या राजकारणाच्या गप्पा मारुन लोक थोडे ज्ञान आणि भरपूर ‘टाईमपास’ करुन घेत असत. अर्थात हवामानातील बदल इतका हलक्यात घेण्याचा विषय नसून त्याचे किती वाईट परिणाम आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर होतात हे आपण वारंवार पहात आहोत. अवकाळी पावसाळामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेेत तर तापमानातील लक्षणीय बदलामुळे आरोग्यासमोर धोका निर्माण झाला आहे. अलिकडेच जागतिक आर्थिक परिषदेत हवामान बदलाच्या दूरगामी परिणामांची काही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालानुसार येत्या 27 वर्षांमध्ये जगभरात तब्बल 1.45 कोटी लोकांचा मृत्यू होणार आहे आणि एक हजार अब्ज रुपयांचे आर्थिक नुकसान!

हवामान बदलामुळे होणाऱ्या सहा प्रमुख घडामोडींचे विश्‍लेषण या अहवालात करण्यात आले आहे. त्यानुसार पुरांमुळे 85 लाख तर दुष्काळामुळे 32 लाख लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. वायूप्रदूषणामुळे दरवर्षी 90 लाख लोकांना प्राणास मुकावे लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याखेरीज 50 कोटी लोकांना जलजन्य आजाराचा धोका संभवतो. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादकता कमी होऊन 7.1 ट्रिलियन डॉलरचे नुकसान होऊ शकते.

हवामान बदलाची व्याप्ती जोवर आपण समजून घेत नाही तोवर या संकटाकडे आपण गांभिर्याने पाहू शकणार नाही. मानवाला हे संकट टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आणि दृष्टीकोनात अमुलाग्र बदल करावे लागणार. केवळ झाडे लावून, वाहनांचा आणि वातानुकूलन यंत्रणेचा कमी वापर करुन नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जाणार नाही किंवा वारेमाप कूपनलिका खणल्या जाणार नाहीत याची दक्षता घेऊन स्वस्थ बसता येणार नाही. हे संकट परतवण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. पर्यावरण समतोलाच्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यावा लागेल. उदाहरण दैनंदिन कचऱ्याचे घेऊया. ओला आणि सुका कचर्‍याचे विघटन असो की प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, या सवयी लावून घेणे अशा संकटांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठरू शकेल. देशाला प्रगतीच्या दिशेने नेताना जे स्थैर्य आणि समृद्धी आपल्याला आनंदी जीवन देणार आहे त्यावर हवामान संकट पाणी फेरु शकते. जागतिक आर्थिक परिषदेची आकडेवारी खरी ठरली तर तिच्यात कितीपट कोव्हिडची तीव्रता आहे, हे समजेल.