ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांची मुलेदेखील दररोज जाणार शाळेत

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोशल एमपावरमेन्ट अँड व्हॅलेटरी असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार अंतर्गत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्रिक टू इंक हा अभिनव उपक्रम ठाणे जिल्ह्यात सुरू झाला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भाऊसाहेब कारेकर यांच्या सहकार्याने भिवंडी जिल्हा परिषदेच्या ८५ शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ब्रिक टू इंक हा अभिनव उपक्रम ठाणे जिल्ह्यात सुरू झाला असून यांतर्गत जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरीत मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, वीटभट्टीवर असलेल्या मुलांचे सर्वेक्षण अणि त्यांचा जवळच्या शाळेत प्रवेश करून त्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

हा उपक्रम सोशल एमपावरमेन्ट अँड व्हॅलेटरी असोसिएशन संस्था ठाणे यांच्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठीची पहिली कार्यशाळा भिवंडी येथे १० जानेवारी रोजी न्यू एरा शाळेत उत्साहात पार पडली.

शाळाबाह्य मुले इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेतील, याकरिता जिल्हा परिषद शाळांच्या मुख्यध्यापकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली, तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासाठी सेवा संस्थेचे प्रकल्प व्यवथापक रामेश्वर भाले व वैभव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या आयोजनात पंचायत समिति भिवंडी गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले व त्यांचे कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.