सुरेश सोंडकर/ ठाणे
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तलाव संवर्धनावर महापालिका कोट्यवधींचा खर्च करत असताना कोलशेत वरचा पाडा येथील तलाव शंभर वर्षांनंतर प्रथमच मासे, आणि जीवजंतू नष्ट होऊन कोरडा ठाक पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरातील अस्तित्वात असलेल्या तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. उथळसर येथील जोगीला तलावासारख्या अन्य तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील आर्थिक तरतूद महापालिकेने केली असून ही कामेही सुरू आहेत. पिण्याच्या व्यतिरिक्त या पाण्याचा अन्य कामांसाठी उपयोग केल्यास पाणी टंचाईवर
काही प्रमाणात मात करता येऊ शकते, या उद्देशाने तलाव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र शंभर वर्षांहून जास्त काळानंतर यंदा प्रथमच कोलशेत तलावातील मासे आणि जीवजंतू नष्ट होऊन तो कोरडा ठाक पडला आहे.
महापालिकेमार्फत याची नियमित देखभाल होत होती. सुशोभीकरणावरही खर्च करण्यात येत होता. या तलावात कटला, रावस असे मासेही मोठ्या प्रमाणात होते. त्याचा लिलाव होऊन महापालिकेला उत्पन्नही मिळत असे, असे येथील ग्रामस्थ प्रकाश शेळके यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
या तलावात २० वर्षांपूर्वी मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. त्यामुळे येथील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त होत असताना श्री.शेळके यांनी आणखी वेगळी माहिती सांगितली. या तलावाशेजारीच भव्य गृहप्रकल्प होत असून पाया भरणीसाठी तलावाच्या खोलीपेक्षा जास्त खोलीचे खड्डे करण्यात येत असावेत, त्यामुळे तलावाचे पाणी झिरपून तलाव कोरडा पडला असावा, अशी शक्यता श्री.शेळके यांनी व्यक्त केली.
तलावांमुळे परिसरालाच शोभा येत नाही तर नागरिकांना फेरफटका आणि मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध होतो. या शिवाय रस्ते, महापालिकेच्या वास्तू, पुलाखालील उद्याने, रस्त्याकडील झाडे यांना पाणी देण्यासाठी तलावातील पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोलशेत तलावातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे करून तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.