क्रिकेट झाला जीवाशी खेळ !

विशेष प्रतिनिधी/ठाणे
ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे क्षमतेपेक्षा जास्त नेट आणि शिकाऊ क्रिकेटपटू यांची तुडुंब गर्दी यामुळे सिझन बॉल लागून लहान खेळाडू जखमी होण्याचा धोका वाढला आहे. माटुंगा जिमखाना मैदानात बॉल लागून एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर सेंट्रल मैदानावरील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांची चिंता वाढली आहे.

ठाण्यातील सेंट्रल मैदानात क्रिकेटचे क्षमतेपेक्षा जास्त १४ नेट असून यापैकी सहा नेट शनी मंदिराच्या दिशेला तर आठ पॅव्हेलियनच्या दिशेला आहेत. प्रत्येक नेटमध्ये जास्तीत जास्त १५ शिकाऊ क्रिकेटपटू असल्यास लहान मुलांना पुरेसे प्रशिक्षण मिळतेच, शिवाय पुरेशी मोकळी जागा मिळून अपघाताचा धोका कमी होतो. मात्र सध्या येथे प्रत्येक नेटमध्ये ३५ ते ४० लहान मुले सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत प्रशिक्षण घेत असतात.

स्पोर्टिंग क्लबने आखलेल्या नियमावलीनुसार प्रशिक्षक अमलबजावणी करत नसून क्षमतेपेक्षा जास्त शिकाऊ खेळाडूंना प्रवेश देतात. यामुळे मैदानात गर्दी होऊन सिझन बॉल लागून एखाद्या मुलाच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती सेक्रेटरी दिलीप धुमाळ यांनी ‘ठाणेवैभव’कडे व्यक्त केली. ठाणे आणि मुंबईतील मैदानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे रोज किमान एक खेळाडू जखमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सेंट्रल मैदानावर क्रिकेट सामने होत असतात. त्यांच्याकडून सेंट्रल मैदानासाठी दरवर्षी फक्त आठ ब्रास माती मिळते, मात्र या पलिकडेही जाऊन असोसिएशनने आऊट फिल्डची योग्य देखभाल करावी, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. सुट्टीच्या दिवशी टेनिस क्रिकेटसाठी मुलांची गर्दी होत असल्याने आम्ही सिझन सामने खेळवत नसल्याचेही श्री.धुमाळ यांनी सांगितले.

क्रिकेट मैदानांवरील वाढत्या अपघातांमुळे लहान शिकाऊ क्रिकेटपटुंच्या पालकांची चिंता वाढली आहे. इच्छुक मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी नेटची संख्या आणि प्रशिक्षणार्थ्यांची संख्या दिवसभरात विभागल्यास गर्दी टाळता येईल. शक्य नसल्यास प्रशिक्षकांनी प्रत्येक स्पोर्टिंग क्लबच्या नियमावलीचे पालन करून गर्दी टाळावी, अशी मागणी मुलांच्या पालकांनी केली आहे.

माटुंगा जिमखाना मैदानात दादर युनियन आणि दादर पारसी या दोन विकेट एकमेकांना लागून आहेत. यापैकी दादर युनियनच्या विकेटवर खेळणाऱ्या जयेश सावला या ५२ वर्षाच्या खेळाडूच्या डोक्याचा वेध दादर पारसी विकेटकडून वेगाने येणाऱ्या बॉलने घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. ठाणे-मुंबईत मैदानावर क्षमतेपेक्षा जास्त होणाऱ्या गर्दीमुळे असे अपघात होत असल्याने पालकांकडून काळजीपोटी मुलांचे प्रशिक्षण बंद करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.