संस्कृती आर्ट फेस्टिवलला सुरुवात

ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेल्या उपवन तलाव परिसरातील संस्कृती आर्ट फेस्टीवलला शुक्रवारी दिमाखात सुरुवात झाली.

उपवन तलावाशेजारी रंगणार्‍या या उत्सवात अयोध्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना श्री राम मंदिराचे दर्शन शहरातच घडणार आहे. ‘राम मंदिर’ या मुख्य विषयाला साजेल अशा कला आणि कार्यक्रम सादर होणार आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या ‘भक्तिरंग’ या कार्यक्रमात ठाणेकर तल्लीन झाले.

दुसर्‍या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोक संगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील. तिसर्‍या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येईल. चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्य कुमार लोक संगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तरंगते ‘तरंग’ हे व्यासपीठ पद्मश्री प्रल्हादसिंह टिपणिया आणि त्यांचा ‘अन्हड’, प्रथमेश लघाटे आणि त्यांचा ‘अंतरी माझ्या श्रीराम’, अन्वेषा हलधर आणि त्यांचा ‘भक्ति राग अनुराग’, पंडित मुकुंदराज देव याचा ‘नाद वैभव’, अनघा पेंडसे आणि प्रशांत काळून्द्रेकर यांचा ‘सगुण…निर्गुण’, हेमा उपासनी, कल्याणी साळुंके, वेदश्री ओक आणि अनंत जोशी यांचा ‘मीरा आणि मी’, संजीवनी भेलांडे यांचा कार्यक्रम होणार आहे.