मुंबई रायगड प्रवास २० मिनिटांत!

अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई: महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन आज पार पाडले. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडी-न्हावा शेवा असा प्रवास केला.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. शिवडीहून न्हावा शेवा अवघ्या काही मिनिटात गाठणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे हा अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला झाला. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे.

आता घोटाळ्याची नाही तर प्रकल्प पूर्ण झाल्याची चर्चा होते-पंतप्रधान

गेल्या १० वर्षांत भारत बदलला आहे. याची चर्चा खूप होते. १० वर्षांपूर्वी हजारो लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची. आता हजारो कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याच्या चर्चा असतात. सुशासनाचा हा संकल्प देशभर दिसत आहे.

आज जगातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला. हे आमच्या संकल्पातील प्रमाण आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धीचे परिमाण आहे. २४ डिसेंबर २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटलं होतं की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

या सेतूच्या बांधकामासाठी जेवढ्या वायर्स आहेत, त्यात पृथ्वीला दोनवेळा प्रदक्षिणा घालून होतील. ४ हावडा ब्रिज, सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार होऊ शकेल, एवढं बांधकाम साहित्य या सेतूसाठी वापरण्यात आलं आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“या सागरी सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालं आहे. तसंच, नवी मुंबईसह पुणे आणि गोवा जवळ येणार आहे. हा सेतू पूर्ण होण्याकरता जपानने मदत केल्याने त्यांचे मी आभार मानतो. आज प्रिय मित्र स्वर्गीय आबे यांची मला आठवण आली. कारण या ब्रिजचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही दोघांनी मिळून केला होता. अटल सेतू भारताच्या त्या आकांक्षाचा जयघोष आहे, जो २०१४ मध्ये पूर्ण देशाने केला होता”, असं मोदी म्हणाले.

अटल टनल आणि चेनाब सारख्या ब्रिजची चर्चा होते. एकामागोएक बनवणाऱ्या महामार्गांची चर्चा होते. इस्टर्न आणि वेस्टर्न, वेस्ट कॉरिडोर रेल्वेचे प्रतिमा बदलणारे आहे. वंदे भारत, नमो भारत, अमृत भारताचे ट्रेन सामान्य माणसांचं जीवन सुकर करत आहेत. आज प्रत्येक देशातील प्रत्येक कोनात नव्या एअरपोर्टचे उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातही अनेक मेगा प्रकल्प पूर्ण होत आहेत”, असंही मोदी म्हणाले.

“गेल्यावर्षी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळेल. करदात्यांचा पैसा विकासासाठी वापरला जात आहे. परंतु, देशावर दशकाहून अधिक काळ शासन करणाऱ्यांनी देशाचा पैसा आणि करदात्यांच्या पैशांचा विचार केला नाही. त्यांचे प्रकल्प पूर्ण व्हायचे नाहीत किंवा उशिराने पूर्ण व्हायचे”, अशी टीकाही मोदींनी केली.

आज अटल सेतू आपल्याला मिळाला आहे, त्याचं प्लानिंग फार पूर्वीपासून सुरू होतं. पण ते पूर्ण करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. वांद्रे वरळी सीलिंक हा अटल सेतूहून पाचपट लहान आहे. या सीलिंकसाठी दहा वर्षे लागले होता. बजेट ४-५ टक्के अधिक वाढले होते. पण, अटल सेतूमध्ये सुविधाहीच नाही इतर गोष्टींचंही साधन आहे. या निर्माणासाठी १७ हजार कामगार, १५०० अभियांत्रिकांना थेट रोजगार मिळाला, अशी अधिकाविध माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अटल सेतू विरोधकांचा अहंकार मोडणारा ठरणार-मुख्यमंत्री

अटल सेतू हा त्याच्या नावाप्रमाणेच अटल आहे. या पुलाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव असणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकार्पण ही या पुलाच्या बळकटीची खात्री देणारी आहे. हा पूल २२ किमी मार्गाचा आहे. भूकंपाचे धक्केही हा पूल सहन करु शकतो. मात्र येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भूकंपाचे झटके आमच्या विरोधकांना बसणार आहेत. शिवडी न्हावा शेवा हा विजयाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. अन्याय आणि अत्याचाराचा अंत करण्यासाशी प्रभू रामाच्या सेनेने समुद्र सेतू बांधला होता. हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार मोडणारा ठरेल यात शंका नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अब की बार ४०० पार या नाऱ्याला बळ देण्यासाठी मी म्हणेन फिर एक बार मोदी सरकार, महाराष्ट्रात ४५ पार हा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत. जो विकास आमचं सरकार येण्याआधी ठप्प झाला होता तो विकास आता मोदींच्या आशीर्वादाने हे सरकार करत आहे. मी नम्रतापूर्वक इतकंच सांगेन की मोदींच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधा सर्वाधिक जास्त प्रमाणात सुरु आहेत. अटल सेतू हा गेमचेंजर प्रकल्प आहे. यामुळे अर्थव्यवस्था बदलणारा ठरणार आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

देशात मोदींच्या नेतृत्वात बुलेट ट्रेनच्या गतीने विकास होतो आहे
आज महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार अत्यंत गतीने काम करतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता बुलेट ट्रेन प्रकल्पही थांबवण्यात आला होता. मात्र आमचं सरकार आल्यानंतर तो प्रकल्पही सुरु झाला आहे. देशाची प्रगती मोदींच्या नेतृत्वात बुलेट ट्रेनच्या गतीने होते आहे हे वास्तव आहे. ५० वर्षात जे जमलं नाही ते मोदींनी ९ ते साडेनऊ वर्षात करुन दाखवलं आहे हे मान्य करावंच लागेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.