आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
ठाणे : शेकडो वेठबिगारींचे स्थलांतरण थांबवुन शासनाने तीन दिवसांत ३० हजार रुपयांचे अर्थसाह्य द्यावे, मुक्त वेठबिगारांना घरे द्यावीत तसेच, त्यांच्या कायमस्वरूपी पुर्नवसनासाठी जमीन, रोजगार द्यावा, आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली.
या आंदोलनात नाशिक, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेकडो वेठबिगार मजुर सहभागी झाले होते. श्रमजीवीचे बाळाराम भोईर, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी घोषणाबाजी केली. साखळदंडाने बांधलेले मजूर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
वेठबिगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या शेकडो मजुरांना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून २०१९ मध्ये मुक्त करण्यात आले. परंतु कुणालाही तत्काळ सहाय्य मिळालेले नाही. शासनाकडून त्यांचे कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन झालेले नाही. तेव्हा, श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी मुक्त करण्यात आलेले शेकडो वेठबिगार मजूर आपल्या कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी वेठबिगार मजूरानी त्यांना शासनाने दिलेले मुक्तीचे दाखले शासनाला परत करण्याचा निर्धार केला.