ठाणे : मुंब्रा कौसा परिसरात शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत एक लाकडी वखार, तीन गाळे आणि १५ दुचाकी जाळून खाक झाल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागले हे समजू शकले नाही. ही आग शॉर्टसर्किटने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तीन हायराईज फायर वाहन, एक वॉटर टँकर, एक रेस्क्यू वाहनासह, एक खाजगी जे.सी.बी. मशीनच्या साहाय्याने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मुंब्रा-कौसा येथील लाकडी वखारीसह तीन गाळ्यांना शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग तासभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात यश आले. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी लाकडी वखारीसह तीन गाळे आणि चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या १५ दुचाकींचा जागेवरच कोळसा झाला.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. घटनास्थळी पोहोचतात दोन्ही विभागांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र या आगीत सेंट्रींग साहित्य असलेली लाकडाच्या वखारीमधील काही लाकडी फळ्या व इतर सेंट्रींग साहित्य जळाले आहे. तसेच मे. ए. आर. बी. ऑटो पार्टस या गॅरेजमधील दुरुस्तीसाठी आलेल्या एकूण १५ दुचाकी वाहने व कॅबिनमध्ये असलेले स्पेअर पार्टचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तर भंगार दुकानातील भंगाराचे प्लास्टिक साहित्य व इतर भंगार साहित्य जळाले आहे. याशिवाय तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या चार झोपड्यांची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही.