ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हेच अध्यात्म !

अध्यात्मिक गुरु डॉ. सुनिल काळे यांचे प्रतिपादन

ठाणे: आपल्या शरीरात अनेक जादुई ॲप्स आहेत, त्याचा आपण वापरच करत नाही. एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ट्रीटमेंट हे जगात सिद्ध झाले आहे. संगितोपचाराने पाश्चात्य देशात आजार बरे केले जातात. तरीही आपल्याकडे विज्ञान शाखेत या गोष्टींचा समावेश केला जात नाही, अशी खंत व्यक्त करीत ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हेच खरे अध्यात्म असल्याचे मत अध्यात्मिक गुरू डॉ.सुनील काळे यांनी व्यक्त केले.

ठाण्यात सुरू असलेल्या ३८व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत गुरुवारी “देहातील महादेव-एक जीवनप्रवास” हे तिसरे पुष्प आध्यामिक गुरु डॉ. सुनिल काळे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष प्रख्यात लेखापाल संजीव ब्रम्हे, माधुरी ताम्हणे आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते.

मी डॉक्टर आहे, संत नाही असे प्रारंभीच स्पष्ट करून डॉ.सुनिल काळे यांनी शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने विवेचन केले. अध्यात्माची पाळेमुळे भारतात आहेत. भारत भूमीवर जी आक्रमणे झाली त्यात ज्ञान जाळले गेले. परंतु ज्ञान कधीच मरत नाही, ही भूमी ज्ञानदेवांची, छत्रपती शिवरायांची आहे. ज्योतीबा फुले, आंबेडकर यांच्या पवित्र भूमीतील ज्ञान कधीच जळणार नाही. शास्त्रीय अभ्यासानुसार दोन लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर राहणाऱ्यांना आपल्यासारखी भाषा येत नव्हती, बोलता, गाता येत नव्हते. तेव्हा कुणीतरी मूळ पूर्वजांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन (जेनेटीक म्यूटेशन) केले, हे मेडीकल सायन्सनेही देखील सिद्ध केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हेच अध्यात्म आहे. हे आपल्याला ऋषी मुनींनी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञान हे निरपेक्ष आहे, ज्ञान जिथून येते त्याला प्रज्ञान आणि प्रज्ञानकडून आलेली पराविद्या जेव्हा झिरपते तेव्हा ते विज्ञान होय. अध्यात्म ही काळाची गरज असून राजकारण्यांना तर याची नितांत गरज आहे. अध्यात्मासाठी वेगळ्या प्रकारची शांतता लागते. तणाव शमविण्यासाठी शांत रहावे. शांततेतच समृद्धी असते, जी गोष्ट शांतता देते तेच अध्यात्म आहे. हे संताचे ब्रम्हवाक्य नाही तर क्वांटम फिजिक्स आहे. सगळ्यात समृद्ध अशी महाराष्ट्र ही भाषा आहे. क्रिस्टल (स्फटिक) सर्वत्र आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. निरपेक्ष प्रेमापेक्षा कुठलेही प्रेम मोठे नाही. हे प्रेम जागृत करा तरच महादेवामधील देव कळेल. तुमच्या देहातील महादेव जर पाण्याला विष करू शकतो तर, विषाला पाणी का नाही करू शकत?असा प्रश्न करून जे शास्त्रज्ञांना माहित आहे ते संतानाही माहित होते. तेव्हा, आजच्या काळात अध्यात्माबरोबरच विज्ञानाचीही गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शास्त्र, पुराणे धर्मग्रंथ आदी सगळ्यामध्ये “हेल्थ इज वेल्थ ” तसेच हिंदु भारतीय संस्कृती अगाध असल्याचे नमूद आहे. तर आपले वर्षभरातील सर्व सण हे बायो मार्कर्स म्हणजेच जैव स्थितीसूचक आहेत. अभिजात संगीत ही भारताची परंपरा आहे. गानकला ही पुराणातील सगळ्या कथा आणि गोष्टीच्या माध्यमातुन समृद्ध आहे. ध्वनींची रचना म्हणजे सौंदर्य लहरी असे आद्य शंकराचार्यानी म्हटले असल्याचे सांगून स्वर, व्यंजने तसेच संगीतातील विविध रागांचे महत्व डॉ. काळे यांनी विषद केले.

आपल्या आवाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची उर्जा आहे. युरोपमध्ये संगिताच्या माध्यमातून सर्व आजार बरे केले जातात. चीनमध्ये तर विशिष्ट शब्द आणि उच्चारावरून रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात असल्याचेही डॉ. काळे म्हणाले. निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट खुप मोठी आहे. आपल्या शरीरात अनेक ॲप्स आहेत, जे आपण वापरलेलेच नाहीत. या सर्व जादू आहेत. एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ट्रीटमेंट जागतीक पातळीवर सिद्ध झाली आहे. तेव्हा सर्व शास्त्रज्ञ सांगत आलेत की, विज्ञानाच्या युगामध्ये आगामी ५ ते १० वर्षात आताची सर्व हॉस्पिटल्स बंद होतील. मात्र, सायन्सच्या मेन स्ट्रीममध्ये हे अद्याप शिकवलेच जात नसल्याची खंत डॉ. काळे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, टिजेएसबीचे विद्याधर वैशंपायन, मकरंद मुळे व मोठ्या संख्येने ठाणेकर नागरीक उपस्थित होते. व्याख्यानाचा समारोप ऋचा आगाशे हिने गायलेल्या वंदे मातरम् गीताने झाला.

सुवर्णयुग सुरू…रामराज्य येतेय!

“वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर भारताची वाटचाल सुरू असून आताचे हे सुवर्णयुग आहे. ज्या रामाची आपण उपासना करतो तो दाशरथी राम नव्हे, तो राम तुमच्या आमच्या मनामनातील कणाकणातील आहे. तेव्हा, मानवता हाच खरा धर्म मानणारे रामराज्य येत आहे. प्रत्येकाच्या देहात ‘ ब्रम्ह, विष्णु, महेश’ आहेत तरी, आपण चमत्काराची अपेक्षा करतो. दुसऱ्यामधील परमेश्वर ओळखा तरच आपल्यातील ईश्वर दिसेल. का म्हणुन पुन्हा पुन्हा परमेश्वराने जन्म घ्यावा? तेव्हा, प्रयत्न करीत राहा. प्रत्येकाच्या देहातील महादेव जागा व्हायलाच हवा, असे प्रबोधनही आध्यामिक गुरु डॉ. सुनिल काळे यांनी केले.