सार्वजनिक शौचालयांच्या सुरक्षेसाठी ठामपा नेमणार सुरक्षारक्षक

ठाणे : सार्वजनिक शौचालयात लाखो रुपये खर्च होत असताना काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून त्याची तोडफोड केली जाते, साहित्याची चोरी केली जाते. हे टाळण्यासाठी शौचालयाच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिका जनजागृती करणार असून सुरक्षारक्षकही नेमणार आहे.

ठाणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात रस्तेदुरुस्ती, सुशोभिकरण सुरू केले आहे. शौचालय दुरुस्तीची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये सुस्थितीत ठेवण्याचा आग्रह खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे पालिक आयुक्त अभिजित बांगर याकडे लक्ष देत आहेत.

महापालिका हद्दीत सध्या ९०६ युनीट असून १२ हजार ५०० शौचालये आहेत. दोन वर्षांपूर्वी बहूतेक शौचालयांची दुरुस्ती केल्यानंतरही तिथे पुन्हा दयनीय अवस्था आढळली होती. त्यामुळे पुन्हा नव्याने दुरुस्तीची कामे हाती घेऊन ६६ नवीन शौचालये उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासर्व कामांचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

बहुतांश शौचालयांमध्ये शौचालयांची तोडफोड करणे, कडी कोयंडे काढून नेणे, दरवाजे तोडणे, शौचालयाचे भांडे फोडणे अशा गैरप्रकारामुळे शौचालयांची दुरावस्था होत असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी या आढावा बैठकीत निदर्शनास आणले. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी स्थानिक स्तरावरील नागरिकांशी सुसंवाद साधून शौचालयाची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्याची सुचना यावेळी आयुक्त बांगर यांनी केली. अशी कृत्ये करणारे गर्दुल्ले निदर्शनास आल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. तसेच काही शौचालयांसाठी सुरक्षारक्षक नेमण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.