कारणे नकोत-खड्डे बुजवा; ३१ जानेवारीची डेडलाईन

आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावले

ठाणे: पावसाळ्यात थांबलेल्या खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना आता अधिक वेग देण्याची गरज असताना काही कार्यकारी अभियंत्यांनी खासगी जमिनी आड येत असल्याची कारणे दिली आहेत. या अधिकार्‍यांची झाडाझडती घेत पालिका आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे.

ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आलेल्या सुमारे ६०० कोटींचा निधी खर्च करून शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, युटीडब्लूटी व डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली. जानेवारी २०२३ मध्ये हाती घेण्यात आलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात कामेही झाली आहेत. पावसाळयात थांबवण्यात आलेली कामे पुन्हा हाती घेण्यात आली असून आता ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्याची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी बुधवारी १० जानेवारी रोजी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली.

या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप नगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे तसेच सर्व प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व कामे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी खासगी जमीन आड येत असल्याने कामास विलंब होत असल्याचे बैठकीत कार्यकारी अभियंत्यांकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळ्यानंतर कामे विलंबाने तसेच टप्प्याटप्प्याने सुरू केल्याबाबत आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारला. तसेच आवश्यक तो पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन सदर कामे युद्धपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीने सर्वांनी सजग राहून काम करण्याचा इशारा दिला.

रस्त्यांशी संलग्न असलेली केबल्स, गॅस पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, महावितरणची केबल्स आदी कामे तातडीने पूर्ण होतील यासाठी देखील संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करुन पुढील कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहराचा विकास करत असताना महापालिकेच्या शाळा देखील सुस्थितीत असणे आवश्यक आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील असतात, या मुलांना देखील चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठ शाळा इमारती या जागतिक दर्जाच्या असल्या पाहिजेत, यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेले काम हे दर्जेदार होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. यासाठी जर अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल तर तो निधीही कमी पडू देणार नाही असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

दिवा भागातील शाळा बांधकामाकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच सर्व शाळांमधील शौचालय देखील नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्यावे. तसेच उर्वरित शाळांच्या दुरूस्ती व नुतनीकरणाबाबतचा आराखडा उपायुक्त शिक्षण यांनी तयार करावा असेही या बैठकीत आयुक्तांनी नमूद केले.