उल्हासनगर महापालिकेतील मुकादम लाच घेताना ताब्यात

ठाणे : उल्हासनगर महापालिका येथील प्रभारी मुकादम संजय पेढामकर यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे विभागाच्या अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले आहे. या बाबतची नोंद हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

लोकसेवकाचे नाव संजय पेडामकर (54) याचे पद प्रभारी मुकादम असून तो उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्र. चारमध्ये प्रभारी मुकादम आहे. पेडामकर याने 2500 रुपयांची लाच मागितली होती आणि त्याने दोन हजार रुपये रक्कम स्वीकारली. 10 जानेवारी 23 रोजी यातील तक्रारदार यांना उल्हासनगर क्र. पाच या परिसरात एकूण चार अनधिकृत ‘शोर्मा’ विक्रीच्या गाड्या चालू ठेवण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र यापूर्वी पाचशे रुपये स्वीकारले होते आणि उर्वरित अडीच हजार रुपये तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 10 जानेवारी 23 रोजी घेऊन येण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदार यांनी लोकसेवक संजय यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी 10 जानेवारी 24 रोजी लोकसेवक संजय हे तीन हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबद्दल ठाणे कार्यालयाच्या ‘अँटी करप्शन ब्युरो’ला लेखी तक्रार नोंदवली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून 10 जानेवारी 24 रोजी पडताळणी केली असता लोकसेवक यांनी तडजोडीअंती अडीच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि यापूर्वी स्वीकारलेले पाचशे रुपये वगळून दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेचच लाचेच्या सापळ्याचे आयोजन केले असता लोकसेवक संजय यांना उल्हासनगर 5 येथील कैलाश कॉलनी चौक उल्हासनगर क्र. ५ या ठिकाणी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये इतकी लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.