नवी दिल्ली: सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने नुकतीच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे. त्यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे तर छत्तीसगढने तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे. इंदूरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राजधानी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहरे आणि राज्यांच्या प्रतिनिधींना पुरस्कार प्रदान केले. स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत 2016 मध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्यात आले. 2023 च्या पुरस्कारांमध्ये 4,416 शहरी स्थानिक संस्था, 61 छावण्या आणि 88 छोटी शहरे समाविष्ट आहेत. मंत्रालयाच्या मते, 1.58 कोटी नागरिकांनी स्वच्छ शहराबद्दल आपला ऑनलाईन अभिप्राय दिला. त्याशिवाय 19.82 लाख फोटो प्राप्त झाले.