मुख्य वॉल्व बंद केल्याने अनर्थ टळला
ठाणे : इमारतीचे खोदकाम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागून महानगरची गॅस लाईन लिकेज झाल्याचे घटना गुरुवारी सकाळी नौपाडा घंटाळी परिसरात घडली.
ही घटना घडल्यानंतर तत्काळ गॅस वाहिनीचा वॉल्व बंद करण्यात आल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. मात्र ऐन सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडल्याने गॅस पुरवठा बंद होऊन गृहिणींच्या कामांचा मात्र खोळंबा झाला. दरम्यान गॅस लाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हात घेण्यात आले असल्याची माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाण्याच्या विष्णू नगर येथे एका खासगी सोसायटीचे नवीन बांधकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस वाहिनी लिकेज झाली. घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. महानगरच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ गॅस पाईप लाईनचा मुख्य वॉल्व बंद केल्याने अनर्थ टळला असल्याची माहिती देण्यात आली.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून काही तासातच परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने दिली.