हजेरी लावून डॉक्टर रुग्णालयातून पसार

Portrait an unknown male doctor holding a stethoscope behind

रुग्णांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कळवा रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर कारवाई

ठाणे : हजेरी लावून रुग्णांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांच्या विरोधात आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे, त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे धाबे दणणाले आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा येथिल रुग्णालय सतत वादात असलेले रुग्णालय आहे. त्या रुग्णालयातील सोयी सुविधांकडे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष लक्ष दिले आहे. या रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर उपचार आणि सुविधा दिल्या जातात का याची अचानक पाहणी आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी ५ जानेवारी रोजी रात्री केली असता रुग्णालयाच्या हजेरी पटावर सही करून दोन निवासी डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडून बाहेर गेल्याची त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी आयुक्त श्री. बांगर यांच्या निदर्शनास आणून त्या दोन्ही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कळवा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तेव्हा देखिल अतिदक्षता विभागात डॉक्टर उपस्थित नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. तरी देखिल डॉक्टर रात्रीच्या वेळी रुग्णालयात उपस्थित नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी डीन, रुग्णालय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर, आणि दोन निवासी डॉक्टर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वीच दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. डॉक्टरांनी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करणे हे त्यांचे काम आहे, वेळेवर रुग्णालयात येणे आवश्यक आहे. यापुढे देखिल रुग्णालयाला अचानक भेट देऊन सही करून जाणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. बिरारी यांनी दिला आहे.