नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा भाड्याने असून ती धोकादायक झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरूळमधील नवीन इमारतीत बुधवारपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात वाढती लोकसंख्या पाहता १९९९-२००० साली वाशीत तात्पुरत्या स्वरूपात ठाणे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले होते. हे कार्यालय पाम बीच मार्गावरील शिव सेंटर इमारतीत होते. येथून ठाणे कार्यालय अंतर्गत काम चालत आहे. त्यानंतर २००४ साली नवी मुंबई शहरासाठी स्वतंत्र अशा उप प्रादेशिक कार्यालयाची स्थापना झाली. हे कार्यालय वाशी एपीएमसी धान्य बाजारात भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून सिडकोकडून नेरूळ सेक्टर १३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने उशीर केल्याने अनेक अडचणी आल्या. या अडचणीवर मात करत अखेर २०१९ मध्ये या उप प्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आणि अल्पावधीतच ही इमारत बांधून तयार झाली. मात्र मागील सहा महिन्यांपासून या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त शासनाला सापडत नाही. त्यामुळे इमारत तयार असून देखील आरटीओचा कारभार जुन्या जागेतून चालत होता.
धान्य बाजारातील इमारत ही जीर्ण झाली असून अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी छताचे प्लास्टर वारंवार घडत आहेत. या वाढत्या घटना पाहता सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारपासून नेरूळमधील नवीन इमारतीतून आरटीओच्या कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काही दिवसातच शासनाकडून सुधारीत वेळ घेऊन या इमारतीचा शासकीय लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली आहे.