ठाणे जिल्ह्यातील नवीन रस्ते निकृष्ट दर्जाचे

* जिल्हा नियोजन बैठकीत आमदार संतापले
* पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

ठाणे: सुरू असलेल्या रस्त्याची कामे सुमार दर्जाची असून ठेकेदाराकडून बनवाबनवी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची वाट लागल्याचा धक्कादायक आरोप आमदारांनी केला आहे. तब्बल नऊ आमदारांनी रस्त्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत आमदारांनी रस्त्यांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात रस्त्याची कामे अर्धवट असून अनेक ठिकाणी मोठ मोठे अपघात होत आहेत. त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मतदारांना देखील सामोरे जायचे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकासकामांनी वेग धरल्याचे भासवले जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कामांबाबत आमदारच तक्रार करीत असतील तर राज्यात काय परिस्थिती असेल, असा सवाल उपस्थित झाला आहे.

रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत या दृष्टीने ठेकेदारांकडून “घिसाडघाई” सुरू असल्याची तक्रार उपस्थित आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. ज्या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल तपासणी झाली नसेल त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी. ज्या रस्त्याचे आयुष्य साधारण ५ ते ७ वर्ष असेल मात्र रस्ते वर्षभरातच खराब झाले असतील तर अशा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देसाई यांनी दिले.

या बैठकीत आमदार महेश चौगुले, रहीस खान, किसन कथोरे, बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, प्रमोद (राजू)पाटील आणि गीता जैन या नऊ आमदारांनी सुरू असलेल्या रस्ते कामांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला.