शिंदे गटाचे बालाजी किणीकर यांना वानखेडे देणार आव्हान

भाजपा नेते राजेश वानखेडे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

उल्हासनगर: अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांच्यासमोर 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर झुंज देणारे भाजपचे माजी सभागृह नेते राजेश वानखेडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. बालाजी किणीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांची कोंडी करण्यासाठी ही व्यूहरचना केली असल्याची चर्चा शहरात आहे.

2009 मध्ये अंबरनाथ विधानसभा निर्माण होऊन मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाली. तेव्हापासून तीनवेळा बालाजी किणीकर हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटली. त्यावेळी राजेश वानखेडे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बालाजी किणीकर यांना झुंज देत अवघ्या 1800 मतांनी वानखडे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या 2019 निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याने त्यांनी निवडणूक लढविणे टाळले.

दीड वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडत बालाजी किणीकर यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतला जाणाऱ्या पहिल्या सात आमदारांमध्ये बालाजी किणीकर यांचा सहभाग होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बालाजी किणीकर यांची शिवसेना खजिनदार म्हणून नेमणूक केली. सद्यस्थितीत बालाजी किणीकर यांच्यासमोर कोणतेही आव्हान दिसत नसतानाच शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, भाऊ म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपचे माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांना सकाळी मातोश्री निवासस्थानी नेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

2007 मध्ये राजेश वानखेडे हे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा उल्हासनगर महापालिकेत निवडून गेले होते. तेव्हा ते भारतीय विद्यार्थी सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी होते. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून साई पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले उपमहापौर विनोद ठाकूर यांना शिवसेनेने तिकीट दिले. तेव्हा राजेश वानखेडे यांनी हार न मानता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरण्याचा निर्णय घेतला. वानखेडे यांनी विनोद ठाकूर यांचा पराभव करत विनोद ठाकूर यांची राजकीय कारकीर्द संपवली. 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राजेश वानखेडे यांनी भाजपचे तिकीट घेत सुभाष टेकडी ह्या मागासवर्गीय बहुल प्रभागात निवडणूक लढवली. चारच्या पॅनल मध्ये त्यांनी स्वतःची जागा निवडून आणण्यात यश मिळवले. राजेश वानखेडे हे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने भाजपानेही त्यांना 2021 ते 22 या काळात सभागृह नेते हे पद देऊन त्यांचा सन्मान केला.