कोलबाड-जागमाता मंदिर परिसरात ठाणेकर झाले सहभागी
ठाणे: केंद्र सरकारच्या योजना देशभरातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरूवात झाली आहे. या यात्रेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे सर्व अधिकारी खेडोपाड्यापर्यंत जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवादात केले.
विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सोमवारी सकाळी कोलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. विविध योजनांची माहिती, नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला. संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे पंतप्रधान यांचा ऑनलाईन संवाद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला. दुपारी १२.३० वाजता या ऑनलाईन संवादाला सुरुवात झाली. प्रथम मा. पंतप्रधान यांनी देशातील वेगवेगळ्या भागात पाच ठिकाणी जमलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यात शेतकरी, हस्त कारागीर, बचत गट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या पहिल्या ५० दिवसांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुमारे १० कोटी नागरिकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
कोलबाड येथील या संकल्प यात्रेस माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, संदीप लेले, नंदा पाटील, दीपा गावंड, उपायुक्त दिनेश तायडे आदी मान्यवर या ऑनलाईन संवादाच्या वेळी उपस्थित होते. नागरिकांनी याप्रसंगी विकसित भारताची शपथही घेतली. ऑनलाईन संवादानंतर नागरिकांनी वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. तसेच, आरोग्य तपासणीही करण्यात आली.