उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून ठाणे जिल्ह्याने पक्षाला चांगली साथ दिली आहे. परंतु आता वेळ कमी आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे बुथ वाईज कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत, काम मोठे जिकिरीचे आहे, पण कामाला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याण तालुक्यातील वरप येथे आयोजित राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, सध्या सरकारपुढे अनेक प्रश्न आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल सरकार प्रयत्नशील आहे. ६२टक्के आरक्षण सोडून उर्वरित हिश्श्यात मराठ्यांना आरक्षण द्यायला कोणाची हरकत नाही, मात्र काही जण टोकाची भूमिका घेत आहेत. मुंबईला येण्याची भाषा करत आहेत, हा देश, राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, त्यामुळे कायदा कोणी हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंरागे पाटील यांचे नाव न घेता दिला.
वय झाले तरी काही जण थांबत नाहीत, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली. काहीजण विकासावर न बोलता भलत्याच विषयावर बोलतात, सध्या वाचाळवीराची संख्या वाढत आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.
ठाणे जिल्हा हा शहरी व ग्रामीण अशा भागात विभागला असून ग्रामीण भागात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ती नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या वर गेली आहे. यावेळी येथील जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारी बाबतीत त्यांनी पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.