गुन्हे घडण्याचे प्रमाण आणि त्यापैकी कितींची उकल झाली याची तुलनात्मक आकडेवारी वापरून नवीन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या पुढील काळातील कामाची दिशा ठरवणे हे संकेतांना धरून असले तरी ते शंभर टक्के बरोबरही नाही. वर्दीतील पोलिस आणि त्यांच्याकडून अपेक्षित कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य हा कामाचा प्रमुख भाग असला तरी वर्दीपलिकडे जाऊन पोलिसी कर्तव्ये पाळली गेली तर तो समाज अधिक सुरक्षित आणि समाधानी रहातो. श्री. डुंबरे यांना ठाणे उत्तम ठाऊक आहे, त्यामुळे पहिल्या कर्तव्यात ते यशस्वी होतीलच, परंतु आमची खात्री आहे की ठाण्यासारख्या सांस्कृतिक पैस असणाऱ्या शहरात श्री. डुंबरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व मोठा प्रभाव पाडू शकेल.
कालानुरूप समाजात बदल हे होत असतात. चिरंतन चालणाऱ्या या प्रक्रियेला गुन्हेगारी अपवाद नाही. पूर्वी चोऱ्या-दरोडे घालणारे पुढे खून-खंडण्यात दंग झाले आणि आता तर सायबर क्राईम आणि अमली पदार्थांचे सेवन यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जागतिकीकरणामुळे दहशतवादाचे लोण गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले आहे आणि शेजारी राहणारा एखादा तरुण वा तरुणीची धरपकड झाल्यामुळे समाजाला कोण धक्का बसत आहे. हे सर्व हादरे बसत राहणार आहेत. परंतु त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाची फार पडझड होऊ नये याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. 11 महिन्यांत अकरा हजार गुन्हे झाल्याची बातमी श्री.डुंबरे यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली त्या दिवशी माध्यमातून प्रसिद्ध झाली. 11 महिन्यात दहा हजार किंवा गेला बाजार 15000 गुन्हे घडले असते तरी श्री. डुंबरे यांच्यासमोरील आव्हानांची तीव्रता कमी झाली नसती हे मापदंड ‘रेग्युलर पॉलिसिंग’च्या बाबतीत योग्य आहेत. परंतु मुळात समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी व्हावी यासाठी एक वातावरण निर्मितीची गरज आहे, ते काम श्री.डुंबरे यांना करून दाखवावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात असे महत्त्वाचे पद भूषवणे तसे सोपे नाही. त्याची कल्पना त्यांना आहे आणि काही ठोकताळे त्यांनीही निश्चित केले असणार. श्री. डुंबरे यांच्याबद्दल खात्यात एक आदरयुक्त जिव्हाळा आहे आणि त्यामुळे हे आव्हान ते लीलया पेलतील याची खात्री वाटते.
ठाण्यात शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या ताण वाढलेल्या शहरातील वाहतूक व्यवस्थेची आहे. वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या रस्त्यांवर वारंवार होणारी कोंडी वाहतूक नियमांची घाऊक पायमल्ली वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ, वाहन चालकांचा वाढलेला बेदरकारपणा, तरुणाईचे वेगात वाहन हाकण्याचे वेड, शेअर रिक्षांचा हैदोस, खाजगी बस वाहतूक, मेट्रोसारख्या कामांमुळे निर्माण झालेले अडथळे अशी लांबलचक जंत्री नागरिकांकडे तयार आहे. या सर्वातून दिलासा देण्यासाठी अमुलाग्र आणि व्यापक अशी योजना आखण्याचे काम श्री. डुंबरे यांना वाहतूक पोलीस खात्याला सांगून करून घ्यावे लागेल. सर्वसाधारणतः हे प्रश्न संवादातून सुटू शकतील. श्री. डुंबरे हे ‘एक्सेसेबल’ आणि ऐकून घेणारे अधिकारी आहेत. त्यामुळे ठाणेकरांची ही अपेक्षा ते प्राधान्याने पूर्ण करतील.
समाजाच्या जीवनशैलीत होणारे बदल हे आर्थिक घडामोडींवर अवलंबून असतात. ठाण्यात आयटीच्या माध्यमातून हजारो तरुण नोकरीस येत आहेत. त्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. त्यातून सवंगपणा डोकावला नाही तरच नवल. त्यामुळे सिगरेट पिणाऱ्या मुली पाहून आता धक्का वगैरे बसणे बंद झाले आहे. तो या मुलींचा खाजगी प्रश्न आहे. मुले सिगारेटही ओढतात तर मग व्यसन करण्याच्या स्वातंत्र्यात लिंगभेद का? असो. चिंता वाटते की या निव्वळ सिगारेटी असतात की आणखी काही? श्री. डुंबरे यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नसावी, कारण त्यांनी सूत्रे स्वीकारताच अमली पदार्थ विरोधी मोहीम घेण्याचे ठरवले आहे.
आम्हाला वाटते की श्री.डुंबरे यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकून गेल्या काही वर्षातील अनुशेष झटपट दूर करण्याचा आग्रह धरणे योग्य होणार नाही. त्यांना थोडा वेळ दिला तर ठाणे पोलिसांची प्रतिमा उजळू शकेल. त्यासाठी शुभेच्छा!
एक वेगळी परंपरा
पोलीस आयुक्त पद तसे महत्त्वाचे आणि नेहमी चर्चेत राहणारे. त्यांच्यापैकी काही डॅशिंग वगैरे असतात तर काही अत्यंत संयत. श्री. डुंबरे हे दुसऱ्या वर्गात मोडणारे अधिकारी आहेत. सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. आम्हाला ते रॉनी मेंडोंसा, अमरजीत सिंह सामरा आणि अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर विवेक फणसळकर यांच्यासारखे वाटतात.