माळशेजमधील काचेचा पूल प्रकल्पाला तत्वत: मंजुरी

बदलापूर: मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात प्रस्तावित काचेचा पूल प्रकल्पाला (ग्लास गॅलरी) शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने नुकतीच तत्वत: मान्यता दिली आहे.

आमदार किसन कथोरे यांनी माळशेज घाटातील पर्यटन विकासासाठी काचेचा पूल उभारण्याची संकल्पना मांडली असून ते त्याचा पाठपुरावा करीत आहेत. नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. ‘खाजगी-सार्वजनिक भागिदारी’ अथवा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वाने हा प्रकल्प उभारावा, असेही बैठकीत ठरले आहे. त्यामुळे माळशेज घाटात पर्यटकांना नव्या रूपाने निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित ग्लास गॅलरी प्रकल्पाच्या सुरक्षितेबाबतचे सर्व निकष पडताळून पाहण्याचे तसेच त्याची अचूक किंमत काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहेत.

निसर्गाचा पर्यटकांना आनंद घेता यावा म्हणून आमदार कथोरे यांनी येथील अनेक पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करून देत त्यांचे रूप पालटले आहे. मूळगाव येथील खंडोबा मंदिर, कोंडेश्वर येथील मंदिर, मुरबाड येथील तलाव आणि निसर्ग केंद्र अशी अनेक ठिकाणी त्यांनी विकसित केली आहेत.

मुरबा़ड मतदारसंघाच्या वेशीवर असलेल्या माळशेज येथील घाटाचेही रूप बदलून येथील पर्यटकांना वेगळ्या प्रकारे निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी आमदार कथोरे प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाटाच्या माथ्यावरील पठारावर विश्रामगृह आहे. त्यालगतच्या जागेतच काचेचा पूल प्रकल्प उभारण्यात येईल. भारतात अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असेल. वन विभागाच्या जागेत हा प्रकल्प होणार असून त्याबदल्यात वन विभागाला पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागाकडे यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अन्य परवानग्या मिळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रस्त्यालगत असणाऱ्या सुविधांच्या निकषात हा प्रकल्प बसत असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

कल्याण-नगर रस्त्याचे रुंदीकरण
काचेचा पूल प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यामुळे पर्यटकांना या प्रकल्पस्थळी येणे सोयीचे ठरणार आहे.

काचेचा पूल प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला .