इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय महिलांचे वर्चस्व

Photo credits: BCCI

डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळल्या गेलेल्या भारत इंग्लंड महिला कसोटीचा पहिला दिवस भारताचा होता कारण दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमानांनी 94 षटकात 410 धावा केल्या. त्यांनी महिला कसोटी क्रिकेटमधील एका पूर्ण डावात प्रति षटकात सर्वाधिक 4.36 धावा नोंदवल्या. भारताने पाचव्यांदा महिला कसोटी सामन्यांमध्ये एका डावात ४०० हुन अधिक धावा ठोकल्या आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने आक्रमक क्रिकेट खेळले. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामीच्या जोडीने प्रत्येक षटकात सुमारे पाच धावा केल्या. सहाव्या षटकात मंधाना (17) हिची विकेट पडली आणि तिची जोडीदार वर्मा (19) नव्या षटकात तंबूत परतली. भारताचा स्कोर त्या वेळी होता ४७ धावा आणि दोन गडी बाद. लॉरेन बेलने इंग्लंडला पहिले यश मानधनाच्या रूपात मिळवून दिले, तर तिच्याबरोबर नवीन चेंडूने गोलंदाजी करणारी केट क्रॉस हिने वर्माची विकेट घेतली.

इंग्लंडला अजून काही विकेट्स लवकर पटकावत आले असते कारण मानधना अँड वर्मा नंतर फलंदाजी करायला आले होते डेबूटंट्स शुभा सतीश आणि जेमिमाह रॉड्रिग्स. परंतु या नवीन जोडीने कमालीचे प्रदर्शन करून सर्वांना भारावून टाकले. या डाव्या-उजव्या हातच्या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 115 धावांची भक्कम भागीदारी रचली. हे दोघेही आपले पहिले कसोटी शतक ठोकतील असे वाटत असताना सोफी एकलस्टन हिने सतीशला (69) आऊट केले आणि मग बेलने रॉड्रिग्सची (68) दांडी गुल केली.

दिवसाची 62 षटके बाकी असताना कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यस्तिका भाटिया यांनी अत्यंत संयमाने खेळ केला. भाटियाने एकलस्टनच्या गोलंदाजीत स्लोग स्वीप चुकवला परंतु मिड ऑन वर उभ्या असलेल्या बेलने एक सोपा झेल सोडून भारतीय फलंदाजाला १५ धावांवर असताना जीवनदान दिले. 62 वर असताना तिला पुन्हा जीवनदान मिळाले. इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने तिचा झेल फर्स्ट स्लिपमध्ये बेलच्या गोलंदाजीवर सोडला. तथापि, त्यानंतर फारसे नुकसान झाले नाही कारण 67 व्या षटकात भाटियाला चार्ली डीनने 66 धावांवर बाद केले. यास्तिका आऊट होण्याच्या काही षटकांपूर्वी, कौर (49) ज्या विचित्र प्रकारे या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ICC महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धावबाद झाली, जवळपास तशाच प्रकारे ती या कसोटी सामन्यात पुन्हा आऊट झाली. कौरची बॅट क्रीजच्या अगदी बाहेर जाम झाली आणि डॅनी वायटने चेंडूने स्टम्प्स उडवले. त्यामुळे कौर आणि भाटिया यांच्यातील ११६ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

शेवटच्या सत्रात, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी सातव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. या अष्टपैलूंनी हुशार क्रिकेट खेळले आणि भारताला 400 च्या पुढे नेले. राणाला 30 धावांवर नॅट सिव्हर-ब्रंटने क्लीन बोल्ड केल्यानंतर पूजा वस्त्राकर (4*) शर्मा (60*) सोबत सामील झाली. वस्त्रकार आणि शर्माची जोडी दिवसाच्या खेळाच्या शेवटी नाबाद राहिली.

खेळाव्यतिरिक्त, भारतीय चाहत्यांना आनंद देण्यासारखे काहीतरी आणखी होते. वृंदा राठी हि कसोटी सामन्यांमध्ये उभी राहणारी पहिली भारतीय महिला पंच ठरली. स्वत: माजी क्रिकेटपटू असलेल्या राठीने याआधी रणजी ट्रॉफी मॅच आणि महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये अंपायरिंग केली आहे. या 34 वर्षीय नवी मुंबईकरासमोर नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंच सायमन टॉफेलसोबत वृंदा राठी (PC: Facebook)