स्थलांतर होऊनही ‘सिव्हील’मध्ये सहा महिन्यांत १३७५ शस्त्रक्रिया

ठाणे: हंगामी स्वरूपात स्थलांतरीत झालेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने अल्प काळात सोयी सुविधांची पुरेशी व्यवस्था केली असून गेल्या सहा महिन्यांत रूग्णांवर विविध प्रकारच्या तब्बल १३७५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

झालेल्या सर्वाधिक शस्त्रक्रिया महिलांच्या विविध समस्यांच्या असून, त्याखालोखाल अस्थि, कान, नाक, डोळे आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. स्थलांतरित तात्पुरत्या ‘सिव्हील’मध्ये येणा-या रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या जागेत स्थलांतरित झालेल्या सिव्हील रुग्णालयात दररोज सुमारे ५०० ते ६०० रुग्ण विविध उपचार करुन घेण्यासाठी येतात. एका महिन्याला सरासरी २०० ते २७५ शस्त्रक्रिया होतात. जून ते डिसेंबर या सहा महिन्यात एक हजार ३७५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.

रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे आहेत. डॉक्टर्स मोठ्या कुशलतेने ती उपकरणे रुग्णांच्या शस्त्रक्रिया करतात.

गेल्या सहा महिन्यांत केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक महिलांच्या विविध समस्यांच्या (गायनॅक) तब्बल १०९० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अस्थीच्या १०३ आणि कान-नाक-डोळ्यांसह लहान-मोठ्या मिळून १८० शास्त्रक्रिया झाल्या आहेत.

तीन महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमीची शस्त्रक्रिया केली होती. एक नेपाळी तरुण जखमी झाल्याने त्याला स्वत:च्या पायावर उभे रहाता येत नव्हते. त्याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. एक महिना रुग्णालयात उपचार , सुश्रुषा केल्यावर त्याला घरी जाऊ देण्यात आले होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले.

शस्त्रक्रियेकरीता रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात असल्यामुळे महागड्या शस्त्रक्रिया सिव्हीलमध्ये होतात. ‘महात्मा ज्योतिबा फुले’ या जन आरोग्य योजनेतंर्गतही या रुग्णालयात शस्त्रक्रिया होतात. दुर्बिणीद्वारेही जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.