विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याने केली नागालँडची धुलाई

PC: Juili Ballal/Thanevaibhav

मितेश पटेल, विष्णू सोलंकी आणि अभिमन्यू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, बडोद्याने सोमवारी नागालँडसमोर ३०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि १४० धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ई गटातील तिसऱ्या फेरीत नागालँडने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविवारी पडलेल्या पावसामुळे आउटफिल्ड ओली होती. सकाळी ९ ला सुरु होणार सामना ११.३० ला सुरु झाला. ३५ षटकांच्या सामना झाला. दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने ग्राउंड कोरडे करण्यात चांगले काम केले. त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमच्या स्टाफच्या बरोबरीने काम केले कारण दोन्ही ठिकाणी सामना जवळ पास एकाच वेळेला सुरु झाला.

ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवर थोडासा ओलावा यामुळे नागालँडच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आर एस जगनाथने डावाच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन नागालँडला चांगली सुरुवात करून दिली. तथापि, बडोद्याने महत्त्वपूर्ण भागीदारी करून आपला डाव उत्तम प्रकारे सांभाळला. पटेल (74 चेंडूत 75 धावा) आणि कर्णधार सोलंकी (60 चेंडूत 84 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करत नागालँडचा सामना हिरावून घेतला. सिंगच्या 21 चेंडूत 62 धावांच्या नाबाद खेळीने बडोद्याला 299 धाव टाकायला मदत केली.

35 षटकांत 300 धावांचा पाठलाग करणे आणि पहिल्या चेंडूपासून प्रति षटक 8.5 पेक्षा जास्त धावा लागणे नागालँडसाठी नेहमीच कठीण होणार होते. दडपणाखाली खेळताना त्यांनी सहा षटकांत तीन विकेट गमावल्या. डावखुरा फिरकीपटू निनाद रथवाने खेळाच्या उत्तरार्धात फिरकीपटूंना मदत करणाऱ्या परिस्थितीचा पुरेपूर उपयोग केला. त्याने केवळ 25 धावांत तीन बळी घेत नागालँडच्या फलंदाजीचे कंबर मोडली. नागालँडसाठी या सामन्यातील कदाचित एकमेव सकारात्मक बाब होती ती म्हणजे होकाइतो झिमोमी (56 चेंडूत 40 धावा) आणि जगनाथ (41 चेंडूत 30 धावा) यांच्यातील 73 धावांची भागीदारी.

विष्णू सोलंकी (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

“आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते. तथापि, प्रथम फलंदाजी करताना आम्ही 35 षटकांत 280+ धावांचे लक्ष्य ठेवले आणि नंतर त्यांना 100 च्या आत बाद करू असा विचार केला होता,” सोलंकी यांनी सामना संपल्यानंतर ठाणेवैभवशी बोलताना सांगितले.

त्याच्या फलंदाजीबद्दल विचारल्यावर सोलंकी म्हणाला, “जेव्हा मी फलंदाजीला गेलो तेव्हा फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध सावधपणे खेळण्याचा आणि नंतर वेगवान गोलंदाजांवर हल्ला करण्याचे ठरवले. जास्तीतजास्त षटके खेळणे हा माझा उद्देश होता. तसेच, परिस्थिती आम्हाला अनुकूल होती कारण आम्हाला बडोद्यात देखील लाल मातीच्या विकेटवर खेळण्याची सवय आहे.”

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील सामना २९ नोव्हेंबर रोजी बंगाल आणि मध्य प्रदेश यांच्यात होणार आहे. सामना सकाळी ९ वाजता सुरू होईल. मध्य प्रदेशमध्ये रजत पाटीदार, व्यंकटेश अय्यर आणि कुमार कार्तिकेय यांसारखे मोठे खेळाडू आहेत, तर बंगालमध्ये शाहबाज अहमद, इशान पोरेल, अभिषेक पोरेल आणि आकाश दीप यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशने त्यांचे तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत तर बंगालने त्यांच्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.