Thanevaibhav Online
7 October 2023
कल्याण : फिलिपाईन्स येथे मागील महिन्यात झालेल्या ‘मिस्टर आशिया २०२३’ स्पर्धेत कल्याणचा अक्षय कारभारी ‘मिस्टर आशिया’चा मानकरी ठरला. भारतातून दहा तर महाराष्ट्रातून अक्षय हा एकमेव स्पर्धक या स्पर्धेसाठी गेला होता.
फिलिपाईन्स येथील सेबु या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत आशिया खंडातील सर्व देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकापेक्षा एक पोज देत अक्षयने उपस्थितांची मने जिंकली.
पश्चिमेकडील उंबर्डे गावातील हिऱ्याचा पाडा येथे राहणाऱ्या अक्षयने वडिलांना कुस्ती खेळताना पाहून इयत्ता तिसरीत असताना कुस्ती खेळायला सुरुवात केली. दहावीपर्यंत जिल्हास्तरीय कुस्ती खेळल्यानंतर आवड म्हणून २०१४ पासून व्यायामशाळेत जाण्यास सुरवात केली. २०१७ मध्ये पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणाऱ्या अक्षयने ‘ठाणे किशोर’चा किताब पटकावला. त्याचप्रमाणे, ‘भारत किशोर’ मध्ये सुवर्णपदक पटकावत किताब उपविजेता ठरला. त्यानंतर, तीन वेळा मिस्टर इंडिया ज्युनियर, तीन वेळा ज्युनियर महाराष्ट्र आणि दोन वेळा गोल्ड मेडल पटकावले आहे.
इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोच मिस्टर इंडिया सुदर्शन खेडेकर यांच्या देखरेखीखाली किशोर शेट्टी यांच्या डोंबिवलीतील व्यायामशाळेत सध्या सहा ते सात तास व्यायामाचा सराव करत असल्याचे अक्षयने सांगितले. शरीरसौष्ठव स्पर्धा आव्हानात्मक असल्याने दर महिन्याला डाएट बदलले जात असल्याचे अक्षय सांगतो. नोव्हेंबर महिन्यात जर्मनी येथे पार पडणाऱ्या मिस्टर युनिव्हर्ससाठी अक्षय सराव करत आहे. मिस्टर युनिव्हर्स हा किताब मिळवणे अक्षयचे स्वप्न आहे. त्यासाठी तो सध्या मेहनत घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांबरोबरच त्याच्या कुटुंबियांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे.