Thanevaibhav Online
5 October 2023
लोकसभा: ठाणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले
ठाणे : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात ४५ खासदारांचे लक्ष्य ठेवले असले तरी ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून महायुतीत गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ठाणे लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीवरून आतापासूनच राजकारण तापले असून ठाण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी, काँग्रेस ल, वंचित बहुजन आघाडी, धर्मराज्य पक्ष तसेच अन्य घटक पक्षांनी यासाठी एकजूट निर्माण केली आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे इंडियाचे प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे.
राज्यात सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मात्र परिस्थिती आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री स्वतः ठाणेकर असल्याने ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा आपल्याकडे राहावी यासाठी शिंदे आग्रही आहेत. ठाणे लोकसभेची जागा शिंदे गट मागणार असेल तर कल्याण आपल्याकडे राहावे यासाठी भाजप देखील कल्याण मतदार संघावर आपला दावा सांगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व सध्या विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे करत असून शिंदे गटाकडून त्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र भाजप आणि मनसेनेही या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने जागा वाटप करताना भाजपची तर निवडणूक लढवताना मनसेचेची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
ठाण्यात शिवसेनेची चांगली ताकद असल्याचा शिंदे गटातील नेत्यांचा दावा आहे. दुसरीकडे मीरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शिंदे गटाचे पारडे जड मानले जात आहे. केवळ नवी मुंबई वगळता इतर दोन ठिकाणी शिवसेना मजबूत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. ठाण्याची जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहावी ,भाजपने त्यावर दावा करू नये, अशी मागणी देखील शिंदे गटाकडून जोर धरू लागली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे दोन स्वतः मुख्यमंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक अशा दोन आमदारांचे पाठबळ आहे. रवींद्र फाटक यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपला असल्याने ते आता आमदार नाहीत. तर ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे ६२ पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक बळ मिळाले आहे.
दुसरीकडे भाजपकडे संजय केळकर, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, गीता जैन आणि पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे असे पाच आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे शिंदे गटापेक्षा भाजपकडे आमदारांचे पाठबळ जास्त असल्याने उभा जागेवर भाजप दावा सांगू शकते.
महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा विद्यमान खासदार राजन विचारे यांचे नाव अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. कल्याण आणि भिवंडी मतदार संघासाठी मात्र अजून कोणाच्या नावाची चर्चा नाही. महायुतीमध्ये मात्र संभाव्य उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असून शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत निश्चिती करण्यात आलेली नाही. भाजपमध्ये मात्र अनेक नावांची चर्चा सुरु असून यामध्ये विद्यमान आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, पक्षाने संधी दिली तर माजी आमदार रवींद्र फाटक यांनी देखील तयारी दर्शवली असल्याचे चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या करण्यात आले अनुषंगाने ठाणे लोकसभेवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी ठाणे लोकसभा समन्वयक तसेच प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर उपस्थित राहणार आहेत. विधानसभेतील सामाजिक,राजनैतिक निवडणूका संघटनात्मक विश्लेषण, सोशल मिडिया तसेच विधानसभा स्तरावर मोर्चाची संयुक्त बैठक असे या बैठकीचे विषय असणार आहेत. तर त्याआधी ५ ऑकटोबर रोजी भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील ठाण्यात येणार असल्याचे समजते. बावनकुळे देखील या दोन मतदार संघाचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.