आरोग्य विभागाची संगणक यंत्रणा उंदरांनी कुरतडली

Thanevaibhav Online

5 October 2023

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेचे कामकाज अलिकडेच नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले आहे. असे असताना नव्या इमारतीमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा दणका आरोग्य खात्यातील संगणक यंत्रणेला बसल्याने संगणक यंत्रणा कोलमडली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत धोकादायक झाल्याने त्या इमारतीच्या परिसरातच नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली असून सर्व कारभार आता नव्या इमारतीमधून सुरु आहे. अद्याप काही दालनातील किरकोळ कामे देखील सुरु आहेत. असे असताना शहराचे आरोग्य जपणाऱ्या आरोग्य खात्याच्या कार्यालयात उंदरांचा सुळसुळाट वाढला असून उंदरांनी संगणकाच्या वायरी कुरतडल्याने चार दिवसांपासून निम्मे संगणक बंद पडले आहेत. आज बुधवारी वायरी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

सुरक्षा रक्षकांचे दालन अडगळीत

नगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधली आहे, मात्र नगरपालिका कार्यालय आणि पालिकेच्या इतर मालमत्ता सांभाळणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना अडगळीची केबिन देण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या इमारतीचे काम अद्याप बाकी आहे, मात्र प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे किशोर धुमाळ यांना विद्युत वायरिंगचे जाळे असणाऱ्या मीटर रूममध्ये दालन देण्यात आले आहे. किशोर धुमाळ दिव्यांग असल्याने त्यांना तळमजल्यावर प्रशस्त कार्यालय देण्याची गरज असताना पालिकेच्या लिफ्टशेजारील मीटर रूममध्ये जागा देण्यात आली आहे. सर्व दालनांत नवे फर्निचर असताना धुमाळ यांना जुने लोखंडी टेबल देण्यात आले आहे. पालिकेत सध्या नगरपालिकेचे आठ आणि सुरक्षा मंडळाचे ३९ अशा ४७ सुरक्षा रक्षकांची जबाबदारी सुरक्षा अधिकारी धुमाळ यांच्याकडे आहे. नवीन इमारतीमध्ये सुविधेची देखील वानवा जाणवते. इन्टरकॉमची सुविधा सुरु करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.