९० टक्के क्षेत्रात दुबार पेरण्याही फसल्या
शहापूर: शहापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला असून खरीप हंगामात भात पिकांच्या 1440 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झाल्या आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी सगुणा राईस टेक्नॉलॉजी (एसआरटी) पद्धतीने 136 हेक्टर क्षेत्रावर लागवड करुन उत्तम प्रतिसाद दिला आहे.
शहापूर तालुक्यात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून चालू हंगामात 1440 हेक्टरवर भात पेरणी झाली असून 216.30 हेक्टर क्षेत्रावर नागली तर 87 हेक्टर क्षेत्रावर वरईची पेरणी झाली आहे. यंदा पावसाचा लहरी बेत असल्यामुळे 90 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्याने दुबार पेरणी केली मात्र दुबार पेरण्याही फसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चालुवर्षी फळबाग लागवडीमध्ये फुलपीक लागवडीसाठी 640 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. दरम्यान आंबा, काजू, फणस, जांभुळ, सोनचाफा आणि मोगरा या पिकांची लागवड सुरु झाली आहे.
मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, एकदाच होणारी भात लागवड यामुळे सगुणा राईस टेक्नॉलॉजी (एसआरटी) पद्धतीला शेतक-यांनी पसंती दिली आहे. तालुक्यात 136 हेक्टर क्षेत्रावर सगुणा राईस तंत्रज्ञानाने भात लागवड झाली असून या (एसआरटी) पद्धतीला शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या लागवडीचा शेतकऱ्यांनी चांगल्या पध्दतीने अवलंब करावा म्हणून कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
या पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च आणि श्रमाची मोठी बचत होण्यास मदत होते. यात श्रम, वेळ आणि पैसा खर्ची पडतो. तयार रोपांच्या लागवडीसाठी दहा ते बारा मजुरांची मदत घ्यावी लागते. या उलट ‘एसआरटी’ लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पण उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते, असे शेतकरी यादव बेलवले यांनी सांगितले.