बदलापूर: बदलापुरातील कोंडेश्वर येथील भोज धरणावर आले असताना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने, या समूहातील रोहित गोहेर या 27 वर्षाच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
15 तासानंतर सोमवारी रोहितचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, मृतदेह बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. रविवारच्या दुपारी रोहित गोहेर हा तरुण त्याच्या इतर चार ते पाच मित्रांसोबत, उल्हासनगरवरून कोंडेश्वर परिसरातील, भोज धरणात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी हे तरुण धरणात पोहण्यासाठी उतरले असता, तेथील पाण्याच्या खोलीचा या तरुणांना अंदाज आला नाही व यातच रोहित गोहेर हा तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या इतर सहकाऱ्यांनी संबंधित गावकऱ्यांना दिली.
गावकऱ्यांनी देखील तत्काळ यासंदर्भात अग्निशमन दलाला पाचारण केले. बदलापूर अग्निशमन दलाला ही माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी त्यांच्या टीमसह, रविवारी संध्याकाळी या धरणात शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार वाढल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी येथील आदिवासी पाडा असलेला धामणगाव येथील तरुणांना सोबत घेत, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही शोध मोहीम पूर्ण केली यावेळी या धरणातील काही पट्टा हा 25 ते 30 फूट खोल असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या मात्र अथक प्रयत्नानंतर, या तरुणाचा मृतदेह आढळला व तो बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. लगेचच हा मृतदेह बदलापूर पूर्व ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी दिली.