वाहतूक कोंडीत अडकला जुना मुंबई-पुणे रस्ता

कळव्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

ठाणे: एकीकडे शहरातील रस्त्यांवर रस्ता दुभाजक टाकले जात आहेत तर कुठे वळणवाटाच बंद केल्या जात आहेत. दुसरीकडे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सह्याद्रीजवळ असलेल्या एसव्हीपीएम शाळेच्या दारात असलेल्या वाहतुक कोंडीने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

ठाण्याच्या कळव्यातील जुन्या मुंबई-पुणे रोडवर सह्याद्री येथे एसव्हीपीएम शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या या रस्त्यावर जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मुंब्य्राकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणार्‍या वाहनांमधून वाट काढत विद्यार्थी रस्ता ओलांडतात. नेमके दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मराठी माध्यमाची दुपारी शाळा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची गर्दी सुद्धा एकाच वेळी होते. पूर्वी शाळा प्रशासनाकडून पालकांना शाळेच्या आतील आवारामध्ये प्रवेश होता. परंतु गेल्या दोन वर्षापासून शाळा प्रशासनाकडून प्रवेशद्वार बंद करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणारे रिक्षाचालक, टू व्हीलर, स्कूल बस रस्त्याच्या बाजूला गाड्या पार्किंग करतात. शाळा सुटल्यानंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ होते. शाळा प्रशासनाकडून ट्रॅफिक वॉर्डन किंवा पोलिसांची नेमणूक वाहतूक शाखेने केल्यास पालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते, असे पालकांकडून सांगण्यात येते. दरम्यान, भविष्यामध्ये एखादा मोठा अपघात झाल्यास शाळा प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का, असा सवालही पालकांकडून केला जात आहे.