ठाणे: माजिवडे येथिल धोकादायक चाळीची पाहणी करण्यासाठी गेलेले अधिकारी ज्या ठिकाणी उभे होते तो भाग अचानकपणे कोसळला. दैव बलवत्तर होते म्हणून त्यांचे प्राण वाचले.
काल संध्याकाळी ६ च्या दरम्यान माजिवडे सिद्धार्थ नगरमधील माळी चाळीचा काही भाग खचल्याची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी, प्रभाग अधिकारी महेंद्र भोईर आणि अभियंते श्री. काळे हे तळ अधिक एक मजली धोकादायक चाळीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी चाळीचा जिना आणि काही भाग थोडा थोडा पडत होता. पहिल्या मजल्याचे बांधकाम कसे तोडायचे याची पाहणी करण्यासाठी तिन्ही अधिकारी पहिल्या मजल्यावर गेले. तेथे पाहणी करण्यासाठी ज्या ठिकाणी ते उभे होते, तोच भाग अचानक कोसळला. प्रसंगावधान राखून काळे या अभियंत्याने समोरच्या गॅलरीमध्ये उडी मारली तर श्री. तडवी यांना भोईर यांनी पकडून स्वतःकडे खेचून घेतले, त्यामुळे या दुर्घटनेतून ते बचावले आहेत.
या चाळीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यांना महापालिकेने एमएमआरडीएच्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले आहे.
माळी चाळ ही सुमारे ५० ते.६०वर्षापूर्वी बांधलेली आहे. मे महिन्यात त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस देण्यात आली होती, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. या चाळीत तळ मजल्यावर सात आणि पहिल्या मजल्यावर पाच कुटुंबे राहतात. त्या सर्वांना महापालिका स्थलांतरित करण्याची शक्यता आहे.